अमेरिकन अध्यक्षांची रशियाला सुचना
वॉशिंग्टन – सीरियातील राजवट अत्याचारी असून त्यांच्या अत्याचाराला पाठिंबा देणे थांबवा अशी सुचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला केली आहे. सीरियातील अध्यक्ष असद यांच्या राजवटीला रशियाचा पाठिंबा आहे. त्या पाठिंब्याच्या जोरावर इडलिब प्रांतातील लोकांवर अत्याचार केले जात असून तेथे लोकांचे हत्याकांड घडवले जात असल्याबद्दल ट्रम्प यांनी खंत व्यक्त केली आहे. या बाबतीत ट्रम्प यांनी तुर्कीचे अध्यक्ष तय्यीप एरडोगन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी रशियाने सीरियातील हस्तक्षेप आणि तेथील सरकारला असलेला पाठिंबा थांबवण्याची गरज व्यक्त केली.
सीरियाच्या इडलिब प्रांतात सीरियन फौजांनी तेथील गनिमांवर कारवाई करण्याच्या निमीत्ताने सरकार विरोधातील सर्वांचाच खात्मा करण्याचे काम केले असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अगदी अलिकडे सीरियन सरकारने त्या प्रांतावर पुन्हा कारवाई केली. त्यावेळी त्या सरकारला मदत करणाऱ्या रशियाने हवाई मार्गाने तेथील गनिमांवर जोरदार बॉम्ब हल्ले केले.
या कारवाईनंतर इडलिब आणि त्याच्या शेजारच्या अलेप्पो भागातील बऱ्याच प्रांतावर सीरियन फौजांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सीरियन सरकारने रशियाच्या मदतीने सुरू केलेल्या कारवाई मुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून तेथील आठ लाख लोकांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे.