जम्मू-काश्‍मीरचे विभाजन मान्य करू नका

पाकिस्तानची पुन्हा उठाठेव: संयुक्त राष्ट्रांच्या उच्चपदस्थांना पत्र

इस्लामाबाद : काश्‍मीरवरून पाकिस्तानच्या नापाक उठाठेवी थांबण्याची चिन्हे नाहीत. आता त्या देशाचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चपदस्थांना एक पत्र पाठवले आहे. त्यात जम्मू-काश्‍मीरचे विभाजन मान्य केले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचे महत्वपूर्ण पाऊल भारत सरकारने 5 ऑगस्टला उचलले. त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. त्यामुळे काश्‍मीरवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यातून काश्‍मीर मुद्‌द्‌याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा आटापीटा पाकिस्तानने चालवला आहे.

कुरेशी यांनी तर संयुक्त राष्ट्रांच्या उच्चपदस्थांना पत्र पाठवण्याचे सत्रच आरंभले आहे. याआधीच्या पत्रांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा नवे पत्र पाठवले. त्यात जम्मू-काश्‍मीरचे विभाजन अवैध असल्याचा कांगावा करण्यात आला.

जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती बिघडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने विभागातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या स्थितीवर लक्ष ठेवावे, असे साकडेही कुरेशी यांनी घातले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.