कोविडसह नॉनकोविड रुग्णांचीही फरफटः व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल
रोज वाढताहेत करोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मृतांचे आकडे काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. तर दुसरीकडे शहरातील बहुतेक व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे नातेवाइकांवर कोणी बेड देता का बेड असे म्हणण्याची वेळ आली आहे. असे असताना सत्ताधारी व प्रशासन मात्र स्वतःच स्वतःचे गुणगान गाण्यात व्यस्त आहे. केवळ करोनाबाधितच नव्हे तर इतर आजाराने ग्रस्त असलेल्या अत्यवस्थ रुग्णांची अवस्था शहरात आता बिकट होऊ लागली आहे.
शहरातील करोना परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे. शहरामध्ये दररोज सरासरी 1100 ते 1200 रुग्ण आढळत आहेत. शहरातील रुग्णसंख्येने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 1224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाढती करोनाची परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या वतीने मागील महिन्यामध्ये ऑटो क्लस्टर येथे 200 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. तर दुसरीकडे राज्यशासन, पीएमआरडीए व महापालिका यांच्या वतीने नेहरुनगर येथे मगर स्टेडियम मैदानावर 800 बेडचे जम्बो रुग्णालय उभारले आहे. मात्र या रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर बेड संपले आहेत. साधे बेड शिल्लक असून याठिकाणी रुग्ण हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने संथगतीने सुरू ठेवली आहे.
ऑटो क्लस्टर रुग्णालयामध्ये 50 आयसीयू आहेत. त्यामध्ये 30 व्हेंटिलेटर असून ते फूल्ल झाले आहेत. वायसीएम रुग्णालयामध्ये 60 व्हेंटिलेटर असून ते फूल्ल झाले आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागत आहे.
शहरातील 39 खासगी रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. विभागीय आयुक्तांनी बेड्सची उपलब्धता दर्शविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डॅशबोर्डनुसार शुक्रवारी दुपारी शहरात केवळ 12 व्हेंटिलेटर शिल्लक होते. त्यापैकी बहुतेक व्हेंटिलेटर हे सशुल्क आहेत. तर व्हेंटिलेटर नसलेले केवळ 89 बेड शिल्लक आहेत. त्यातही बहुतेक बेड हे खासगी रुग्णालयातील सशुल्क बेड आहेत. ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही, त्यांना महापालिकेच्या रुग्णालयावर विसंबून राहवे लागते. मात्र महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू झाली आहे.
रुग्णांची फरपट
वाढत्या रुग्णांच्या सोयीसाठी शहरामध्ये जम्बो व ऑटो क्लस्टर रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये फक्त तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना भरती केले जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र अनेक रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णालयाचे बिल भरणे शक्य होत नाही. महापालिकेने मोठा गाजावाजा करत शहरामध्ये कोविड केअर सेंटर व रुग्णालये तयार केली मात्र तरीही रुग्णांची फरफट सुरूच आहे
येथून रुग्ण हलवा – वायसीएम
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये एका रुग्णाची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. मात्र रुग्णाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होती. तसेच न्यूमोनियाची लक्षणे असल्याचे वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट होत आहे. त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता होती. दुसरीकडे बेड मिळत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हतबल झाले होते. अशावेळी वायसीएम प्रशासनाने रुग्णाला येथून हलविण्याची सूचना केली. अशी परिस्थिती असल्यास करोना नसलेल्या रुग्णांनी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नॉन कोविड रुग्ण वायसीएममध्ये ठेवणे शक्य नाही. पुन्हा त्या रुग्णाला करोनाची लागण झाली तर नातेवाइक आम्हाला दोष देतात. निगेटिव्ह असेल तर डी वाय पाटील रुग्णालयाचा पर्याय आहे. त्याठिकाणी महापालिकेच्या दरानुसार उपचार केले जातात.
-डॉ. राजेश वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय.