दररोज एक हजार चाचण्या करा

तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सूचना;लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न

नगर – ग्रामीण भागात करोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. प्रत्येक तालुक्यात दररोज आरटीपीसीआर व अन्टिजेन चाचण्या वाढविण्यावर भर असून, एक दिवसांत एक हजार चाचण्या करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, लसीकरण मोहीम व्यापक करून ऑनलाइन माहिती भरण्याची निर्देश तालुका आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आरोग्य अधिकार्‍यांची व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन करोना पार्श्‍वभूमीचा आढावा घेतला. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, डॉ. दादासाहेब साळुंके, डॉ. प्रकाश लाळगे आदी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटरमध्ये असणार्‍या रुग्णांची दक्षता घ्यावी. आरोग्यविषय सुविधा तत्काळ पुरवून रुग्णांची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात काही रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत.

ते रुग्ण घरा बाहेर जाणार नाहीत याची खात्री करण्यात यावी. वारंवार चौकशी करून त्यांची काळजी घ्यावी. गृहभेटी देऊन यापुढे कोणीही गृहविलगीकरणामध्ये राहणार नाही. त्यांना तत्काळ कोविड सेंटरला दाखल करा. कॉन्टंक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येऊन त्यांच्या टेस्ट करा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबद्दल कोणीही हलगर्जीपणा करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये कोविड 19 आजाराचे जास्तीचे बिल काही रुग्णालय घेत असतात अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास गटविकास अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीने ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी. रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने मेडिकल चालक देत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. रेमडेसिविरची कमतरता असल्यास मागणी करावी, असा सूचना तालुकास्तरीय अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

अपडेट व्हॉटसअप कळवा
तालुक्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपस्थित रहावे. त्याचा तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी आढावा घ्यावा. गैरहजर राहणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी. दैनंदिन कामकाजाचे अपडेट व्हॉटस्अ‍ॅपवर कळवावे, असेही सूचित केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.