उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला अधिकाऱ्यांना दम
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू झाला असल्याचे दिसत आहे. त्यातच त्यांनी काम चांगलं झालं तर किरकोळ चुका देखील पोटात घेऊ, पण कामं झाली नाहीत, तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू असा सज्जड दम कामचुकार अधिकाऱ्यांना भरला.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. यावेळी अजित पवार म्हणाले की, आज पुण्यात एसआरए प्रकल्पाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे भाडे महिन्याला 12 लाख रुपये आहे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक सर्व सामान्य नागरिकाचे समाधान होईल. असे काम करा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिला.
तसेच ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नये, त्यातून व्यवहारी मार्ग काढा, मी तर आता झोपूंच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठ चौकातील एक दोन उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. त्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.