आळंदी – राम नवमीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदानाच्या उटीपासून शिंदेशाही रूप साकारले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद असल्याने माऊलींचे हे शिंदेशाही रूप भाविकांना केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून डोळ्यात साठवून ठेवावे लागले.
नूतन मराठी वर्ष (गुढीपाडवा), राम नवमी, अक्षय तृतीया आणि नरसिंह जयंती अशा चार निरनिराळ्या अवतारांतील रूप माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीच्या माध्यमातून साकारण्यात येते. त्यापैकी आज रामनवमीनिमित्त शिंदेशाही अवतार साकारण्यात आला होता.
यासाठी सुमारे 60 किलो गोपीचंदनाचा वापर करून अभिजित, योगेश चौधरी व महेश या कलाकारांनी हे शिंदेशाही रूप तीन तासांत साकारले होते. यासाठी त्यांना स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्ष आशा तापकीर, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर, सर्व सहकारी तसेच स्वकामच्या सर्व सदस्यांनी यासाठी मेहनत घेतली.
दरम्यान, पहाटेपासूनच माऊली मंदिरात नित्याचे धार्मिक कार्यक्रम पार पडले असल्याचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यानंतर येणाऱ्या अक्षय तृतीयेला माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनाची तिसरी उटी पार पडणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.