आळंदीत 724वा संजीवन समाधी दिन सोहळा आज रंगणार
आळंदी – टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या जयघोषात रविवारी (दि. 24) लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत द्वादशीनिमित्त माउलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून त्याची परंपरेप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ असा गजर होताच अनेक हात माउलींचा रथ ओढू लागले. अशा भक्तिमय वातावरण नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत कार्तिकीवारी सोहळ्यातील रथोत्सवाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. तर सोमवारी (दि. 25) “श्रीं’चा 724वा संजीवन समाधी दिन सोहळा रंगणार आहे.
द्वादशीनिमित्त माउलींच्या समाधीवर पहाट पूजेत पवमान अभिषेक व दुधारती खेडचे प्रभारी प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर, सर्व नगरसेवक नगरसेविका मान्यवर भाविकमोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी मंदिरात प्रांत आणि तहसीलदार यांच्या परिवाराच्या उपस्थितीत पहाटे पूजा परंपरेने उत्साहात झाली. यानंतर भाविकांच्या महापूजा आणि दर्शनासाठी श्रींचा गाभारा भाविकांना खुला झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास माउलींचा चांदीचा मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवून श्रींचा लवाजमा शनिमंदिरमार्गे गोपाळपुऱ्यातील राधाकृष्ण मंदिरात नेण्यात आला. राधाकृष्ण मंदिरात इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माउलींची विधिवत पूजा परंपरेने पौराहित्यांचे वेदमंत्र जयघोषात झाली.
पूजेदरम्यानच्या कालावधीत अनेक वारकरी रथोत्सवात सहभागी होण्यासाठी गोपाळपूरच्या दिशेने आले. पूजा झाल्यानंतर माउलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी रथात ठेवण्यात आला. रथासमोर वारकऱ्यांची दिंडी भगव्या पताका उंचावत “माउली… माउली’चा गजर करत होते. गोपाळपुरातील वैभवी श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने श्रींची पूजा, आरतीनंतर श्रींच्या रथोत्सवात श्रींची पूजा बांधण्यात आली. श्रींच्या रथोत्सवातील वैभवी रूप पाहण्यासाठी श्रींच्या दर्शनास भाविकांनी तीर्थक्षेत्रातील नगरप्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तर माउलीनगर येथे पुष्पवृष्टी करण्यात येऊन पालखीचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी देवाची येथील पोलीस ठाण्याजवळ पालखी येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करून पुष्पअर्पण केले.
गोपाळपूर, नगरप्रदक्षिणामार्गे, भैरवनाथ मंदिर, हजेरी मारुती मंदिर, नगरपरिषद चौकमार्गे पुढे श्रींचा रथोत्सव श्रींचा शाही लवाजमा हरिनाम गजरात मंदिरात आला. श्रींच्या मंदिरात परंपरेने हरिभाऊ बडवे यांचे वतीने कीर्तन सेवा, नगरप्रदक्षिणा करून श्रींच्या रथोत्सवातील पालखीचे मंदिरात आगमन झाले. श्रींची मंदिर प्रदक्षिणेनंतर धुपारती त्यानंतर विणा मंडपात केंदूरकर यांचे वतीने कीर्तनसेवा झाली. परंपरेने मंदिरात रात्री पासधारकांना खिरापत पूजा महाप्रसाद वाटप, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप श्रींच्या गाभाऱ्यात करण्यात आले.
आळंदी नगरपालिकेने रथोत्सव मार्गावर स्वच्छता आणि अतिक्रमाण मोहीम राबवित भाविकांची सेवा रूजू केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 724 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटकमधील वारकऱ्यांची संख्याही यावर्षी
मोठी राहिली.
नामदेवरायांच्या वंशजांच्या वतीने आज महापूजा
श्रींच्या सजीवन समाधी सोहळा सोमवारी (दि. 25) साजरा होणार आहे. या सोहळ्यात परंपरेप्रमाणे सकाळी दहा ते बारा या वेळेत संत नामदेवराय यांचे 17वे वंशज नामदास महाराज यांच्यावतीने देऊळवाड्यात श्रींच्या संजीवन समाधी प्रसंगाची कीर्तनसेवा परंपरेने रूजू होते. मात्र, यंदा दिवे घाटातील अपघातात नामदास महाराज यांचा मृत्यू झाल्याने ही परंपरा नामदास महाराज यांच्या दोन मुलांमधील भावार्थ नामदास महाराज यांची कीर्तनसेवा पार पाडणार आहे. यानंतर घंटानाद, पुष्पवृष्टी वर्षाव, आरती होणार आहे. दरम्यान, काल्याचे कीर्तनानंतर श्रीगुरु हैबतबाबा यांचे दिंडीची समाधी मंदिर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य, सोपानकाका देहूकर यांचे वतीने विणा मंडपात परंपरेने कीर्तन, धुपारती व हैबतबाबा आरफळकर यांचे वतीने हरिजागर होणार आहे. श्रींचे मंदिरात भाविकांचे तसेच नामदेवरायांच्या वंशजांचे वतीने श्रींना महापूजा होईल. तत्पूर्वी प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते श्रींना पवमान अभिषेक व दुधरती होईल.
पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंगाच्या पादुका यावर्षीही आळंदी कार्तिकी वारीसाठी हरिनाम गजरात आल्या आहेत. इंद्रायणी तीरावरील मल्लाप्पा वासकर महाराज यांच्या फडावर श्री पांडुरंगाच्या पादुका व पालखी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती.