वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील शासकीय कर्मचाऱ्यांना अद्यापही महापालिकेकडून पगार व दिवाळी बोनस मिळालेला नाही, तो त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करीत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी अशा कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेत मदतीसह दिवाळी मिठाईचे वाटप केले. यामुळे खऱ्याअर्थी या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
वाघोलीसह पालिकेत समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांना थकीत पगार व बोनस मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना भेटून या प्रश्नी चर्चा करण्यात आली. समाविष्ट बहुतांशी गावातील कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये त्रुटी आढळून आल्याकारणाने संबंधीत गावातील मनपा कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आलेले नाहीत, अशा त्रुटी तातडीने दुरूस्त करून वाघोलीसह अन्य गावातील कर्मचाऱ्यांचे पगार फरकासह लवकरच देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर मोहोळ यांनी दिले असल्याचे कटके यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामपंचायत (मनपा), तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, पोलीस कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, महावितरण कर्मचारी यांच्यासह आशा वकर्स, सफाई कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
कटके म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेत मदतीसह दीपावलीच्या आनंदोत्सवात मिठाई वाटप करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांचा आर्थिक भार कमी होईल व अनेकांची दिवाळी आनंदात साजरी होईल. आर्थिक अडचणीच्या काळात मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. सर्व अनावश्यक खर्च टाळून दिवाळीचे औचित्य साधत उपयुक्त उपक्रम राबविला, याचे समाधान आहे.