ज्ञानदेव माझी आई, सांभाळी गे माई

एम. डी. पाखरे
आळंदी –  बहू जन्माची आई पुण्याई।
शरण आलो तुझे पायी।।
ज्ञानदेव माझी आई।
सांभाळी गे माई।।
ही भावना मनात बाळगून माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाला लाखो वारकरी आपल्या घरातूनच सहभागी झाले.

“ज्ञानोबा तुकोबा’ असा अखंड जयघोष… टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला गजर…वारकऱ्यांनी धरलेला फुगडीचे फेर… हरिनामाचा अखंड निनादणारा आसंमती जयघोष… भगवी पताका खांद्यावर घेतलेले वारकरी… तुळशी वृदांवन डोक्‍यावर घेतलेल्या महिला वारकरी… देहभान हरपून भजनात दंग झालेले भाविक… तल्लीन होऊन नाचणारे भक्‍तगण… असा नयनरम्य सोहळा केवळ अन्‌ केवळ करोनामुळे शनिवारी (दि. 13) अलंकापुरीत लक्षलक्ष नयनांना टिपता आला नाही. केवळ 50 मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी चारच्या सुमारास सर्व शासकीय नियमांचे पालन करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले.

मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी माउलींच्या आरती झाल्यानंतर सोहळा विसावला. आता पुढील 17 दिवस आजोळ घरात भजन आणि कीर्तनसेवा पार पडणार आहे. तर पालखी सोहळा विसावल्यानंतर वरुणराजाने हजेरी लावली होती.

दरम्यान, मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिला करोनामुळे मृत्यू झाल्याने मंदिर परिसर फर झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला होता. तर नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात सॅनिटायझर केले होते. संस्थान कमिटीने निमंत्रित पासधारकांचे थर्मल स्कॅन, सॅनिटायझर करून मास्क लावूनच मंदिरात प्रवेश दिला गेला. लक्षावधी वारकऱ्यांच्या मनात मात्र माऊली दर्शनाची आस अशीच कायम राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.