अलाहबाद – पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे तपासण्यासाठी “डीएनए’ चाचणी करता येईल आणि त्याचा निकाल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल असे अलाहबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणामध्ये हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
हमीरपूर येथील एका जोडप्याचा कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट झाला आहे. मात्र घटस्फोटानंतर तीन वर्षांनी या महिलेने आपल्या माहेरी असतानाच एका मुलाला जन्म दिला. महिलेने हे बाळ पतीचेच असल्याचा दावा केला आहे. मात्र पतीने घटस्फोटानंतर आपण पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले नसल्याचे सांगत बाळ आपले नसल्याचे म्हटले आहे.
हे प्रकरण पुढे उच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयाने या महिलेचा घटस्फोटित पतीच बाळाचे वडील आहेत की नाही ते तपासून पाहण्यासाठी “डीएनए’ चाचणीचा मार्ग योग्य असल्याचे म्हटले. या चाचणीमुळे पत्नी व्यभिचारी आहे की नाही म्हणजेच तिचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल.
या प्रकरणामध्ये पती राम आरसे याने कौटुंबिक न्यायलयासमोर “डीएनए’ चाचणी करण्यासंदर्भातील अर्ज केला होता. मात्र कौटुंबिक न्यायायलयाने हा अर्ज फेटाळून लावला. अखेर उच्च न्यायालयातील न्या. विवेक अग्रवाल यांच्या एक सदस्यीय खंडपिठाने “डीएनए’ चाचणीसाठी होकार दिल्याचे वृत्त एका वृत्तवहिनीच्या संकेतस्थळाने दिले आहे.