बलात्कारप्रकरणी दुसऱ्यांदा जामीन फेटाळला; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा निर्णय
पुणे – बलात्काराच्या गुन्ह्यात तरुणी गर्भवती राहिल्यानंतर डीएनए चाचणी निगेटिव्ह आल्यास संशयिताने केलेल्या गुन्ह्यामध्ये फरक पडत नाही. अल्पवयीन पीडितेने पोलिसांसमोर दिलेला जबाब आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेला 164चा जबाब यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे आरोपींना जामीन देता येणार नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. तो ग्राह्य धरत सत्र न्यायाधीस एस. आर. भांगडिया यांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील दोघांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला.
हुसेन उर्फ दादा नरसु वाघमोडे (वय 45), दत्तात्रय उर्फ दत्ता बाळू काळे (वय 18) अशी जामीन फेटाळेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 15 वर्षीय पीडितेच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडीता एकाच परिसरात राहतात. पीडीता ही वाघमोडे याच्या मुलीची मैत्रीण आहे. त्यामुळे ती त्याच्या घरी अभ्यासासाठी जात होती. यावेळी, त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.
तर, तिच्या ओळखीचा असलेल्या काळे याने लग्नाच्या आमिषाने तिच्याशी संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे. आईने दवाखान्यात नेल्यानंतर पीडित तरुणी गर्भवती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डीएनए टेस्टच्या अहवालात बाळाचा आणि आरोपींचा डीएनए जुळत नव्हता.
या मुद्द्यावर बचाव पक्षाच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या अशाच गॅंगरेप प्रकरणात डीएनए मॅच झाला नव्हता. तेव्हा न्यायालयाने पीडितेने केलेल्या तोंडी पुराव्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याच्या न्यायनिवाड्याचा दाखला दिला. तसेच, दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तरीही परिस्थिती बदल झाला नसल्याने गुन्ह्याच्या गांभीर्यात बदल होत नाही, असा युक्तीवाद सरकारी वकील बोंबटकर यांनी विरोध केला. न्यायालयाने तो मान्य केला.