चेन्नई – द्रमुकचे आमदार आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षातील प्रमुख वक्ते असलेले जे. अनबाझगन यांचे आज खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू होते. त्यातच न्यूमोनिया झाल्यामुळे अनबाझगन यांची प्रकृती अधिक ढासळली. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले, असे डॉ. रेला इन्स्टिट्युट ऍन्ड मेडिकल सेंटरने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मूत्रपिंडाच्या तीव्र आजारासह अनबाझगन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एक दिवसानंतर श्वसनाचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने 3 जून रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हृदय आणि मुत्रपिंडाचा विकार बळावल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.
10 जून, 1958 रोजी जन्मलेल्या तीन वेळा आमदार राहिलेल्या अनबाझगन यांचा आज 62 वा वाढदिवस होता. वाढदिवशीच त्यांचे निधन झाले. ते द्रविड चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि द्रमुकचे नेते दिवंगत पजाकदाई जयरामन यांचे पुत्र होते.