उत्सवाची आचारसंहिता पाळल्यास डी.जे.ला परवानगी

पोलीस निरिक्षक मोरे यांचे आश्‍वासन

भोर- शहर आणि ग्रामीण भागातील मंडळांनी गणेशोत्सवात आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण मंडळ स्थापन करावे. तसेच नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे. गणेशोत्सव शांततेत आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतल्यास मंडळांना मिरवणुकीत डी.जे. लावण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्‍वासन पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार भोर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील अभिजित मंगल कार्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनासाठी विशेष सभा आयोजित केली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक राजू मोरे बोलत होते. यावेळी महेश धरु, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पवार, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे, पत्रकार चंद्रकांत जाधव, विजय जाधव, निलेश खरमरे, प्रा. उमेश देशमुख, अतुल काकडे, कुणाल धुमाळ, प्रा. सुरवसे समवेत विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू मोरे म्हणाले की, या वर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करुन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा. पोलीस देखील मंडळांना मदतीचा हात देतील. मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, जीवंत देखावे सादर करणाऱ्या मंडळांना रात्री 12 वाजेपर्यत परवानगी देण्यात येईल.

भोर शहरात 45 पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे आहेत. देखाव्यांचे परीक्षण करण्यासाठी पाच जणांचे मंडळ स्थापन करुन तीन नंबर काढण्यात येणार आहेत. या भोर पोलीस स्टेशनकडून मंडळांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा राजू मोरे यांनी केली. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी केले.
वर्गणीची रक्कम पुरग्रस्तांना देणार शहरातील अमर तरुण मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात जमा होणारी 65 ते 70 हजार रुपये कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे अतुल काकडे यांनी जाहीर केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×