मेलर्बन – टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच सध्या कोर्टबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. करोना लसीकरणावरून जोकोविच विरुद्ध ऑस्ट्रेलियन सरकार असा न्यायालयीन लढा सुरू आहे. ऑस्ट्रेलियन सरकारकडून दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मेलबर्नमधून शनिवारी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी उद्या, रविवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये 17 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन-2022 ही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी जोकोविच 6 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, त्याच्याकडे करोना लसीबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. तसेच लसीकरणाच्या नियमातून सूट मिळाल्याचीही आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याचा व्हिसा पहिल्यांदा रद्द करत त्याला विमानतळावरूनच ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्याला मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत त्याला दिलासा दिला होता.मात्र, शुक्रवारी (14 जानेवारी) ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ऍलेक्स हॉक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत जोकोविचचा व्हिसा पुन्हा एकदा रद्द केला. आरोग्य आणि सुव्यवस्था ही कारणे देत त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्या व्हिसावर सुनावणी सुरू असल्याने पुन्हा एकदा जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने ताब्यात घेतले आहे.
यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रॅंडस्लॅम पदके जिंकली आहेत. सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत जोकोविच राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. जोकोविचने जिंकलेल्या 20 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांमध्ये 9 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या विजेतेपदांचा समावेश आहे.