लसीकरणावरून जोकोव्हिच आक्रमक; म्हणाला,“मी लस घेतली की नाही ही खासगी बाब, जाहीर करणार नाही”

न्यूयॉर्क : सर्बियाचा  जगप्रसिद्ध खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता सध्या तरी कमीच वाटत आहे. आतापर्यंत नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेल्या नोव्हाकने लसीकरण झालं आहे की नाही हे जाहीर करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मेलबर्न येथे ही स्पर्धा पार पडणार असून स्टेट ऑफ व्हिक्टोरियाने व्यावसायिक खेळाडूंसाठी लससंबंधी नियमावली जाहीर केली आहे. मात्र यावेळी त्यांनी विदेशातून येणाऱ्या खेळाडूंसाठी सविस्तर नियमावली अद्याप दिलेली नाही. मात्र नोव्हाकने आपली लसीकरणाची माहिती देण्यास नकार दिला आहे. Serbian daily Blic शी बोलताना नोव्हाकने, “गोष्टी जशा आहेत तशाच आहेत, मला अजूनही माहित नाही की मी मेलबर्नला जाईन की नाही,” असे  सांगितले  आहे. “मी लस घेतली आहे की नाही हे जाहीर करणार नाही. ही खासगी बाब असून अशा पद्दतीची चौकशी करणं अयोग्य आहे,” असेही नोव्हाकने म्हटले आहे.

तसेच, “आजकाल लोक एखाद्याला प्रश्न विचारताना तसंच त्याच्याबद्दल मत निर्माण करताना मर्यादा ओलांडण्याचं स्वातंत्र्य घेतात. तुम्ही होकार, नकार द्या किंवा विचार करतोय असं सांगितलं तरी ते फायदा घेणार आहेत”.

गेल्या महिन्यात नोव्हाक जोकोव्हिचचे सर्वाधिक २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले. जोकोविचला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करत आपले पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले  होते.

“नक्कीच मला जायचं आहे. ऑस्ट्रेलिया माझी सर्वात यशस्वी ग्रॅड स्लॅम स्पर्धा राहिली आहे. मला स्पर्धेत उतरायचं आहे. माझं या खेळावर प्रेम असून त्यापासून मला अद्यापही प्रेरणा मिळते,” असं नोव्हाकने सांगितलं आहे.

“ऑस्ट्रेलिया ओपनमधील स्थितीवर माझं लक्ष असून अंतिम निर्णय़ (करोनासंबंधित नियमावली) पुढील दोन आठवड्यात घेतला जाणार आहे. यावर्षीप्रमाणे खूप निर्बंध असतील असं वाटतं, पण जास्त बदल होतील का याबाबत मला शंका आहे,” असेही त्याने सांगितले.

“माझा मॅनेजर ऑस्ट्रेलिया टेनिस फेडरेशनच्या संपर्कात असून लस घेतलेल्या आणि नाही घेतलेल्या अशा सर्वांसाठी परिस्थितीमध्ये सुधारणा कऱण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे,” असे नोव्हाकने सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.