वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – पारंपरिक खेळ वाद्यांना फाटा देत यावर्षी वडगाव शहरातील सातव्या दिवशी विसर्जन झालेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूकीत डीजे, डॉल्बीच्या आवाजाची जणू स्पर्धा लागली होती. नियमांचे उल्लंघन करत एकापेक्षा एक मोठ्या आवाजाचे डीजे लाऊन डीजेच्या दणदणाटात गणरायाला निरोप देण्यात आला.
वडगाव शहरातील विसर्जन मिरवणूकीत एकापेक्षा एक मोठ्या आवाजाचे डीजे, डॉल्बी सिस्टिम लावण्यात आल्या होत्या. नियमबाह्य आवाजाने वडगावकर नागरिक हैराण झाले होते.
नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहे. वडगाव शहरात पूर्वी विसर्जन मिरवणूकीत ढोल लेझीम पथकाच्या स्पर्धा लागायच्या.
ढोल लेझीम पथकांचे खेळ पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहायचे. मात्र यंदा डीजे, डॉल्बीच्या आवाजामुळे लहान मुले, वृद्धांनी विसर्जन मिरवणूकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
मागील तीन चार वर्षांपासून गणेश मंडळे पारंपारिक वाद्यांना फाटा देत मोठ्या आवाजात डीजे वाजवून मिरवणूक काढण्यावर भर देत आहेत. तसेच डीजेच्या आवाज किती मोठा हा जणू मंडळांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
यंदा तर वडगाव शहरात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आदी ठिकाणावरून खास मोठ्या आवाजाचे डीजे डॉल्बी सिस्टिम मागविण्यात आले होते. आवाजाची तीव्रता मोजण्यासठी कोणतीही यंत्रणा पोलिसांकडे यावर्षी पाहायला मिळाली नाही.
त्यामुळे पोलीस तरी कारवाई कशाच्या आधारावर करणार, असा प्रश्न उपस्थित झाला. डीजे, डॉल्बीच्या वाढत्या आयोजनामुळे ढोल – लेझीम पथकाचे अस्तित्व कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे.