आज दिवाळी पाडवा; विक्रम संवत्सर आजपासून सुरू

पुणे – लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुक्‍ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ दिवस आहे. यादिवशी नवे विक्रम संवत्सर सुरू होते.

आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. या वह्या सुरू करण्यापूर्वी त्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात.

अमावस्या सोमवारी सकाळी 9.08 वाजेपर्यंत असल्याने दिवाळी पाडव्याचे नव विक्रम वर्षारंभाचे मंगलस्नान सकाळी 9.09 नंतरच करावे, असे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळाचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले, असे मानले जाते. या दिवशी “इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. काही ठिकाणी बळीची अश्‍वारूढ प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते. यासह घरोघरी पत्नी पतीला औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी देतो.

उद्या भाऊबीज
नरक चतुर्दशी, अमावास्या आणि बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या दिवसांत गणली जाते. कार्तिक शुक्‍ल द्वितीयेला यमद्वितीया अर्थात भाऊबीज म्हटले जाते. कार्तिक शुक्‍ल द्वितीयेच्या दिवशी यमराज बहिणीने केलेले भोजन करून तिचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.