गोर-गरिबांची दिवाळी गोड

पुणे – जिल्ह्यात प्रशासकीय काम करत असताना त्या जिल्ह्यातील गोर-गरिबांची दिवाळी आनंदात व्हावी. त्यांनाही फराळाचा आस्वाद मिळावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील आदिवासी भागातील वसतीगृहात राहणारे विद्यार्थी, पेसा (आदिवासी) क्षेत्रातील अंगणवाडी अंतर्गत विद्यार्थी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना फराळ वाटप करून त्यांच्याबरोबर अधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.

यावेळी उदय जाधव यांच्या हस्ते मावळ तालुक्‍यातील कल्हाट येथील आनंद आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि 9 अंगणवाड्यातील विद्यार्थी असे एकूण 200 जणांना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शरद माळी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्‍यातील 24 वसतीगृहांतील 784 विद्यार्थी आणि 12 अंगणवाड्यातील 216 बालकांना अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले.

तसेच, प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील 10 वसतीगृहातील 275 विद्यार्थी, 59 अंगणवाड्यातील 300 बालक तसेच खेड तालुक्‍यातील 225 विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.