fbpx

संगमनेरकरांना दिवाळी भोवली

संगमनेर -गेल्या पाच दिवसांपासून संगमनेर तालुक्‍याचा कोविड आलेख वाढतच चालला आहे. दिवाळीच्या गर्दीने ग्राहक आणि दुकानदारांना चपाट्यात घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. तालुक्‍याने बाधितांचे 48 वे शतक ओलांडीत 4 हजार 842 रुग्णसंख्या गाठली आहे. 

या महिन्यातील 20 दिवसांत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येतील तब्बल 40 टक्के रुग्ण केवळ पाच दिवसांत समोर आले आहेत.दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यातून संक्रमणात भर पडली. ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून संगमनेरच्या बाजारपेठेचा मोठा लौकीक आहे. सुवर्ण अलंकार, कापड, तेल-तुप व भुसार मालाची बाजारपेठ असलेल्या संगमनेरात दिवाळीच्या निमित्ताने होणारी उलाढाल संगमनेरची गर्दी दाखवणारीच ठरते. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून बाजारपेठांमध्ये गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन झाल्याने शहरी भागातील बहुतेक ग्राहकांनी दिवाळीची गर्दी सुरु होण्यापूर्वीच खरेदी उरकली.

मात्र, ग्रामीण भागातील अर्थकारण दूध संस्था व साखर कारखान्यांवर अधिक अवलंबून असल्याने या संस्थांकडून पैसे मिळाल्याशिवाय बाजारपेठा फुलत नाही असा आजवरचा इतिहास आहे. यंदाही नेहमीप्रमाणे दिवाळीच्या काही दिवस अगोदर नागरिकांच्या हाती पैसा आल्याने दिवाळी खरेदीच्या शेवटच्या चार दिवसांत संगमनेरच्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे दृष्य दिसत होते. त्यामुळे दिवाळीनंतर कोविडच्या संसर्गात मोठी वाढ होवून परिस्थिती पुन्हा एकदा अनियंत्रित होण्यासारखी अवस्था निर्माण होईल असा अंदाज जाणकारांनी बांधला होता. तो तंतोतंत खरा ठरत असल्याचे गेल्या पाच दिवसांतील आकडेमोडीवरुन स्पष्टपणे दिसत आहे.

या पाच दिवसांत केवळ ग्रामीणभागच नव्हे तर शहरी रुग्णसंख्याही दुप्पट वेगाने पुढे सरकल्याचे दिसून आले. मागील पाच दिवसांत शहरात सरासरी 11.6 रुग्ण दररोज या वेगाने 58 तर ग्रामीण भागात दररोज सरासरी 31.8 या वेगाने 159 रुग्ण समोर आले आहेत. यावरुन संगमनेरकरांना दिवाळी भोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच काही छोट्या-मोठ्या आस्थापनांमधील कर्मचारीही बाधित झाल्याचे समोर आल्याने येणाऱ्या काळात तालुक्‍याच्या एकूण संक्रमणात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.