नवी दिल्ली – दीवाळी सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक कुटुंबात मोठ्या थाटामाटात विशेष पूजा केली जाते. यावेळी 4 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार असून लोक लक्ष्मी-गणेशाची पूजा करून स्वत:साठी सुख-समृद्धीची कामना करतील. दिवाळी हा सण केवळ भारतातच नव्हे तर जगातील विविध देशांमध्ये साजरा केला जातो आणि अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी करण्याची शैली वेग वेगळी आहे.
भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. नेपाळमध्ये हिंदूंची मोठी लोकसंख्या आहे आणि येथे दिवाळी विशेष पद्धतीने साजरी करण्याची प्रथा आहे. देवी-देवतांव्यतिरिक्त, नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवशी प्राण्यांची पूजा देखील केली जाते. या दिवशी लोक विशेषतः कुत्र्यांची पूजा करतात. या दिवशी कुत्र्यांना हार घालून त्यांची पूजा केली जाते. याशिवाय त्यांना आवडीचे पदार्थही खायला दिले जातात.
काय आहे मान्यात?
लंकेवर विजय मिळविल्यानंतर भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले. त्यांच्या परतीच्या स्मरणार्थ दिवाळी हा सण साजरा केला जातो. नेपाळमध्येही भगवान राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. येथे दिवाळीला तिहार म्हणतात आणि हा दिवस कुकुर तिहार म्हणून साजरा केला जातो. कुकर म्हणजेच कुत्रा. म्हणून या दिवशी कुत्र्यांची पूजा करण्याची प्रथा अशी सुरू झाली.
तिहारच्या दिवशी नेपाळमध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले जाते आणि भारताप्रमाणेच घरे दिव्यांनी सजवली जातात. दिवाळीचा सण येथे चार ते पाच दिवस चालतो आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कुकुर तिहार आयोजित केला जातो. या दिवशी कुत्र्यांचे पूजन केले जाते. हार घालून गुलालाची उधळण करून त्यांचा सन्मान केला जातो. एवढेच नाही तर कुत्र्यांना दूध, फळे, ब्रेड, अंडी असे आवडते पदार्थ खायला देऊन ट्रीटही दिली जाते.
का केली जाते कुत्र्यांची पूजा?
कुत्र्यांना यमदेवाचे दूत मानले जाते. महाभारत काळातही कुत्र्याने युधिष्ठिरासह स्वर्गात प्रवास केला होता. नेपाळमध्ये असे मानले जाते की कुत्रे आयुष्यभर निष्ठेने माणसाचे रक्षण करतात आणि मृत्यूनंतरही ते आपल्या मालकाची काळजी घेतात. त्यामुळेच कुकुर तिहारच्या दिवशी त्यांचा सन्मान केला जातो. दिवाळीनिमित्त येथे केवळ कुत्राच नाही तर गाय, बैल, कावळे यांचीही पूजा केली जाते.