पुणे – दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एस.टी.) प्रवाशांना राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या कालावधीत खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांत जाण्यासाठी प्रशासनाने जादा बस नवीन शिवाजीनगर बसस्थानक (वाकडेवाडी) येथून सोडल्या जाणार असल्याचे एस.टी. प्रशासनाने सांगितले आहे.
दिवाळीला गावी जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यासाठी दिवाळीच्या आगोदर सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी एस.टी. प्रशासनाने एक महिना आगोदर आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आरक्षणासाठी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आसनसंख्या वाढविली जाणार असल्याची माहिती, प्रशासनाने दिली आहे.
आरक्षणासाठी सांकेतिक कोड
प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करण्यासाठी “एनएसएनसीआर’ हा कोड वापरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, जादा बसेसच्या आरक्षणाचे ऑनलाइन तिकिट महामंडळाचे संकेतस्थळ व मोबाइल ऍपवरून करता येणार आहे.
दिवाळीनिमित्त आगाऊ आरक्षण करण्याची सोय एस.टी.च्या अधिकृत खासगी आरक्षण केंद्रावरही उपलब्ध करण्यात आले आहे. याचबरोबर, जादा बसेसची सोय केली जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक (एस.टी), पुणे विभाग