पाच कोटींची कामे काढली : नूतनीकरण, दुरुस्तीच्या नावाखाली उधळपट्टी
मंदिर परिसरातील उद्यानावर पालिकेचा खर्च
चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात महापालिकेमार्फत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. तीन ठेकेदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यापैकी पी. ए. शिरोळे इंजिनिअर्स यांनी इतर ठेकेदारांपेक्षा 3.99 टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यानुसार, त्यांना हे काम देण्यात येणार आहे. 1 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च महापालिका या कामावर करणार आहे. बारा महिन्यांच्या मुदतीत हे काम करण्यात येणार आहे.
पिंपरी – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध पाच उद्यानांमधील नूतनीकरण, दुरुस्ती, सीमाभिंतीची उंची वाढविण्याच्या नावाखाली सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. उद्यान विभागाच्या या कामांमधून स्थापत्य विभागाची “दिवाळी’ झाली आहे. आशिया खंडातील “श्रीमंत’ महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लौकिक आहे. मात्र, अनावश्यक कामांवरील अव्वाच्या सव्वा खर्चामुळे महापालिकेच्या “श्रीमंती’ ला ग्रहण लागले. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाला ओहोटी लागली.
जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक अवस्था दोलायमान झाली. त्यामुळे मागील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मंजूर झालेले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरेशा तरतुदी अभावी गुंडाळून ठेवण्यात आले. महापालिका आर्थिक गर्तेतून कशीबशी सावरत असताना पुन्हा अनावश्यक विकास कामांवर उधळपट्टीचा सपाटा सुरु झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर महापालिकेच्या विविध पाच उद्यानांमध्ये स्थापत्य विषयक कामांसाठी स्थायी समितीच्या एकाच सभेत पाच कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
विशेष म्हणजे हे सर्व आयत्यावेळी मांडण्यात आलेले सदस्य प्रस्ताव होते.
स्थापत्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचे हे सर्व प्रस्ताव आहेत. महापौर राहुल जाधव यांच्या बालेकिल्ल्यातील सावतामाळी उद्यानात मोकळ्या जागेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. त्यावर 3 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीने बिनबोभाट मंजुरी दिली. हे काम सिद्धनाथ कॉर्पोरेशन यांना देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील राम मंदिर उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. सव्वा कोटींचा खर्च या कामावर होणार आहे. तावरे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.
दापोडी येथील आई उद्यानाच्या सीमाभिंतीची उंची वाढविण्यात येणार आहे. सुमारे 82 लाखांचा खर्च महापालिका या कामावर करणार आहे. सुनील सूर्यवंशी यांना या कामाचे कंत्राट देण्यात येणार आहे. दापोडीतील सितांगण उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार असून हे काम देखील सूर्यवंशी यांनाच देण्यात आले आहे. 57 लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.
रहाटणी येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानातील लॉनचे नूतनीकरण करण्यात आले. 16 लाख 53 हजार रुपयांचा खर्च या कामासाठी होणार असून हे काम जी. बी. इंटरप्रायजेस यांना देण्यात आले आहे. थेरगाव येथील बापुजी बुवा उद्यानात स्थापत्य विषयक कामांसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. एस. एस. इंटरप्रायजेस यांनी लघुत्तम दर सादर केला. त्यांना हे काम देण्यात येणार असून त्यासाठी 49 लाख रुपये महापालिका मोजणार आहे. विशेष म्हणजे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेल्या उधळपट्टीवर विरोधकांनीही चुप्पी साधल्याने करदाते आश्चर्य व्यक्त करीत आहेत.