पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमण्याचा पायंडा पाडला आहे. प्रकल्प करत असताना केवळ सल्ला मिळविण्यासाठी ठेकेदारी कंपन्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यात बुधवारी (दि. 3) झालेल्या स्थायी समितीमध्ये कहर केला. तब्बल आठ कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. महापालिकेच्या बोऱ्हाडेवाडी येथील गायरान जागेतील आरक्षणावर शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी मेसर्स प्लॅनिटेक कन्स्लटन्सी यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या शाळेच्या कामासाठी 6 कोटी 97 लाख 31 हजार 179 रुपर्य खर्च येणार आहे.
या खर्चाच्या 0.90 टक्के म्हणजेच 6 लाख 27 हजार 616 रुपये सल्लागारी संस्थेला द्यावी लागणार आहे. तर याच संस्थेला पुणे नाशिक महामार्ग गट क्रमांक 1062 पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्त केले. या कामासाठी 2 कोटी 3 लाख 86 हजार 407 रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चाच्या 0.80 टक्के म्हणजेच 1 लाख 63 हजार 91 रुपये या संस्थेला दिले जाणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 येथील राजे शिवाजीनगर येथील रस्ते अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी देखील सल्लागारी संस्थेची नियुक्ती केली आहे. या कामासाठी मेसर्स पेव्हेटेक कन्स्लटिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना प्रकल्पाच्या 0.83 टक्के रक्कम दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 18 कोटी 51 लाख 54 हजार 328 इतका खर्च येणार आहे.
त्यापैकी 15 लाख 36 हजार 780 रुपये सल्ला घेण्यासाठी द्यावे लागणार आहेत. नेहरुनगर येथील जुनी शाळा इमारत पाडून त्याठिकाणी नवीन शाळा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी मेसर्स प्लॅनिटेक कन्स्लटन्सी यांना इमारत बांधण्याच्या खर्चापैकी 1 टक्के रक्कम दिली जाणार आहे.
इमारत बांधण्यासाठी 1 कोटी 39 लाख 44 हजार 200 रुपये खर्च आहे. त्यापैकी 1 लाख 39 हजार 442 सल्लागार संस्थेला देण्यात येणार आहे. प्रभाग 8 येथील तिरुपती चौक येथील तुलसी हाईटस समोरील रस्ता ते पेठ क्रमांक 1 पर्यंत डीपी रस्ता करण्यासाठी ऍस्युरड इंजिनिअरिंग सर्व्हिस यांना 98 हजार 563 रुपये देण्यात येणार आहे. या कामासाठी 98 लाख 56 हजार 342 रुपये खर्च आहे. महापालिकेकडे अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांचा फौजफाटा असताना महापालिका सल्लागारांना पोसत असल्याचा आरोप होत आहे.
पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठीही सल्लागार
प्रभाग क्रमांक 8 मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी देखील सल्लागार नेमण्यात आला आहे. या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रस्ता दुभाजक व रोड फर्निचरच्या कामासाठी इन्वायरोसेफ कन्स्लटंट यांना काम देण्यात आले आहे. त्यांना 4 लाख 6 हजार 199 रुपये देण्यात येणार आहे. याच सल्लागार संस्थेला रस्ता सुशोभीकरणाच्या कामासाठी 3 लाख 94 हजार 250 रुपये देण्यात येणार आहे. पदपथाचे सुशोभीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक बसविणे या किरकोळ कामांसाठी देखील सल्लागार नेमून पालिकेच्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचे काम सल्लागार संस्था करत असल्याची चर्चा या निमित्ताने पालिका वर्तुळात रंगली आहे.