मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअर बाजारात मात्र खरेदीच चालू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेअर बाजार निर्देशांकात सलग सहाव्या दिवशी वाढ नोंदली गेली. विशेष म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून आता भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू झाली आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 104 अंकांनी वाढून 59,307 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12 अंकांनी वाढून 17,576 अंकावर बंद झाला.
ऍक्सिस बॅंकेच्या शेअरचा भाव आज नऊ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बॅंक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांनी आज तेजीचे नेतृत्व केले. मात्र बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, लार्सन अँड ट्यूबरो, एशियन पेंट्स, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जागतिक पातळीवर अनिश्चित परिस्थिती असूनही भारतीय कंपन्यांचे चमकदार ताळेबंद जाहीर होत आहेत. त्याचबरोबर भारतातील संस्थागत गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार खरेदी चालूच ठेवत असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्याचे दिसून येत आहे. युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक आज व्याजदर वाढीमुळे पिछाडीवर होते.
सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स तब्बल 1,387 अंकांनी म्हणजे 2.39 टक्क्यांनी वाढला आहे. तर निफ्टीत 390 अंकांची म्हणजे 2.27% यांची वाढ झाली आहे. रेलीगेअरचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था उत्तम असल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. मात्र तरीही जागतिक परिस्थिती कमालीची अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदार तितकेच सावध आहेत.
आज मिडकॅप आज 0.75 टक्क्यांनी कमी झाला तर स्मॉल कॅप 0.60 टक्क्यानी कमी झाला. बॅंकिंग, वित्तीय क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर भांडवली वस्तू, धातू क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते. बऱ्याच दिवसापासून विक्री केल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1,164 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली आहे.
आता दिवाळीत खरेदी चालूच राहते की नाही याकडे बऱ्याच गुंतवणूकदारांचे व विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक आज पिछाडीवर होते. त्याचबरोबर अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक नकारात्मक पातळीवर होते. मात्र भारतीय शेअर बाजारात खरेदी चालूच आहे.