पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांशी शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळातच विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षाही सुरु आहेत. त्यामुळे, शिक्षकांवर कामाचा डबल भार पडला असून त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या पहिल्या शैक्षणिक सत्राचा समारोप निवडणुकीपूर्वी करून शिक्षकांना निवडणुकीसाठी वेळ द्यावा लागणार आहे.
दरम्यान, निवडणुकीमुळे महापालिका शाळांच्या सुट्टयांमध्येही वाढ करण्यात आली आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राचा समारोप ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा उरकून त्यांना सुट्टी देण्यात येते. यावर्षी, दिवाळीसण आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी आल्या आहेत. दिवाळीपूर्वी होणाऱ्या सहामाही परीक्षाही याच कालावधीत होत असल्याने शिक्षकांना निवडणुकीच्या कामांबरोबरच विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठीही वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे, मतदानापूर्वीच विद्यार्थ्यांच्या परीक्षा उरकून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग असतो.
या कामांसाठी निवडणूक विभागाकडून 80 टक्के शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. यावर्षी महापालिका शाळेतील शिक्षकांच्या नेमणुका या कामांसाठी करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना निवडणुकीचे पहिले व दुसरे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शिक्षक निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता घेऊन शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा 20 ऑक्टोबरपूर्वी आटोपण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तोंडी परीक्षा व काही विषयाच्या लेखी परीक्षाही आटोपल्या आहेत.
20 ऑक्टोबरपासून शाळांना सुट्टी
यावर्षी 26 ऑक्टोबरपासून महापालिकेच्या शाळांना सुट्टी देण्यात येणार होती. मात्र, निवडणुकीसाठी शाळांचा वापर करण्यात येणार असल्याने त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे पहिले शैक्षणिक सत्र 19 ऑक्टोबर रोजी संपवण्यात येणार असून 20 ऑक्टोबरपासून महापालिका शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अन्य खासगी शाळांनाही शनिवारपासून सुट्ट्या लागत आहेत.