शाळांच्या सुट्टीत वाढ; पाच ऐवजी चौदा दिवस सुट्टी जाहीर
पुणे – राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी गेल्या पाच महिन्यापासून ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्यात आले. शाळांना दिवाळीच्या पाच दिवस सुट्टया जाहीर करुन एक दिवस उलटत नाही तोच शाळांना एकूण 14 दिवसांच्या सुट्टया देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. आता शाळांना 7 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी असणार आहे. प्रत्यक्षात शाळा सुरु झालेल्या नसतानाच शाळांच्या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे विशेषच म्हणावे लागणार आहे.
मार्च पासून करोनाचे संकट कायम आहे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांच्या आरोग्याचा विचार करुन शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला होता. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जाऊ नये यासाठी शाळांनी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला. सततचा लॉकडाऊन त्यात घरबसल्या ऑनलाइन शिक्षण यामुळे सुरुवातीला सर्वांचीच डोकेदुखी वाढली होती. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
दरवर्षी दहा ते पंधरा दिवसांपर्यंत दिवाळीची सुट्टी असते. यंदाही दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाइन शिक्षणालाही सुट्टी मिळावी अशी अपेक्षा विद्यार्थी, शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्र्यांनी 12 ते 16 नोव्हेंबर अशी पाच दिवसांची दिवाळी सुट्टी देण्याचा निर्णय गुरुवारी (दि.5) घेतला होता. त्यावर एवढी कमी दिवसांची सुट्टी मिळाल्याने शिक्षक संघटनांसह विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
याची दखल घेत गायकवाड यांनी त्वरीत शुक्रवारी (दि.6) सुट्टयांबाबतचे सुधारित आदेश जारी केला आहे. त्याद्वारे दिवाळीच्या सुट्टीत आता वाढ झाली आहे. यामुळे आनंद निर्माण झालेला आहे. या सुट्टयांमुळे ऑनलाइन शिक्षणही बंदच ठेवण्यात येणार आहे. काही शाळांच्या सत्र परीक्षा सुरु झालेल्या होत्या. या सुट्टयांमुळे या परीक्षांचे वेळापत्रकही कोलमडणार आहे.