पुणे – येवलेवाडी येथील कुष्ठरुग्ण वसाहतीमधील 17 जणांनी करोनावर मात केली आहे. या वसाहतीमधील 22 जणांवर महापालिकेच्या शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. यशस्वी उपचारानंतर या रुग्णांना दिवाळी भेट देत निरोप देण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
या वसाहतीमधील चार रुग्णांना दोन आठवड्यांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांची शारीरीक स्थिती लक्षात घेऊन शहरातील अनेक रुग्णालयांनी त्यांना उपचारास नकार दिला. त्यानंतर ही बाब महापालिकेच्या निदर्शनास येताच अतिरिक्त आयुत रूबल अग्रवाल यांनी पुढाकार घेत जम्बो हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यासाठी 40 बेड राखीव ठेवले.
त्यात, पहिले चार रुग्ण दाखल केल्यानंतर या वसाहतीमधील इतरांची तपासणी केली असता आणखी 18 जण बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर या सर्वांना या रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यातील केवळ एका रुग्णाची प्रकृती गंभीर होती.
त्याच्यावरही यशस्वी उपचार केल्यानंतर त्यास घरी सोडले होते. त्यानंतर मंगळवारी 17 जणांना एकाचवेळी घरी सोडले. यावेळी या रुग्णांना मिठाई तसेच मास्कचे वाटप केले. यावेळी डॉ. किरण शहा, डॉ. पद्माकर पंडीत, डॉ. गणेश साने, डॉ. कपाले आदी उपस्थित होते.