राहुल गणगे
पुणे – जिल्हयातील हवेली, पुरंदर व दौंड तालुक्यातील 136 गावठाणांची ड्रोनने केलेली मोजणी पूर्ण झाली आहे. त्यातील 24 गावांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. तेथील नागरिकांना दिवाळीत मिळकत पत्रिकेची भेट मिळेल. त्यामुळे जिल्ह्यातील घराघरांत असणाऱ्या भावकीच्या वादावर आता पडदा पडेल. तसेच नागरीकांना मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे.
गावठाण जमाबंदी प्रकल्प, स्वामित्व योजना अंतर्गत मिळकत पत्रिका व सनद प्रत्येक जमीनधारकास मिळावी. यासाठी राज्यातील भूमापन न झालेल्या सर्व गावठाणातील मिळकतीचे भूमापन करण्याची योजना केंद्राने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील मिळकतधारकांना मिळकत पत्रिका वितरणाचे लक्ष निर्धारित केले आहे.
2018 मध्ये राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरीमध्ये राबविला होता. तो यशस्वी झाल्याने राज्यासाठी लागू करण्याचा शासन निर्णय दि. 22 फेब्रुवारी 2019 ला घेतला. त्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. राज्यात प्राथमिक स्तरावर 101 गावांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील हवेली 12, पुरंदर 11 तर दौंड 7 गावांची मोजणी केली.
यामध्ये हवेली 6, पुरंदर 11 तर दौंडमधील 7 असे एकूण 24 गावांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले. गावठाणाच्या मानवी मोजणीसाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. ड्रोनने मात्र अवघ्या एका दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. पुढील पाच महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमी अभिलेख विभागाचे आहे.
राज्यात 55 टक्के नागरिकांचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे. मात्र गावठाणातील जागेचे मालकीपत्र नसल्याने बॅंकेचे कर्ज घेण्यास मर्यादा येतात. या मोजणीमुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र व सीमा निश्चित होऊन मालकी हक्क अभिलेख पत्रिका बनेल.
गतीने गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोनद्वारे मिळकतीची अचूक मोजणी होते. त्यानंतर या मिळकतींची चौकशी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते. मालकी हक्क ठरवल्यानंतर त्याचे डिजिटायझेशन केले जाते. त्यानंतर त्वरित डिजिटल स्वरूपात नकाशा व मिळकत पत्रिका जनतेस मिळतात. ही प्रक्रिया महिन्यात पूर्ण होते.
-राजेंद्र गोळे, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख.
गावाची पत सुधारणार
ड्रोन सर्वेक्षणात गावातील रस्ते, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाल्यांची सीमा निश्चिती केली जाईल. यामुळे भविष्यात होणारी अतिक्रमणे रोखता येतील. तसेच मिळकतदारांना मिळकत पत्रिका मिळाल्यास कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मिळकतींची बाजारपेठेत किंमत वाढून गावची आर्थिक पत सुधारणा अपेक्षित आहे.
नागरीकांना होणारे फायदे
प्रत्येक धारकाच्या जागेचा नकाशा तयार होईल. प्रत्येकाला मिळकत पत्रिका व सनद मिळेल. कर्जासह विविध योजनांचा लाभ मिळणार बांधकाम परवानगी साठी मिळकत पत्रिका तयार गायरान जमिनींचे रेकॉर्ड अपडेट होणार सरकारी जागेवरील अतिक्रमण कळणार पायाभूत सुविधांसाठी सरकारी जागा उपलब्ध