पुणे – वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट 10 दिवसात मंजुर झाला आहे. 11 जुलै रोजी दाखल केलेला दावा 21 जून रोजी निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.ए. बागे-पाटील यांनी हा निकाल दिला आहे. या निकालामुळे दोघांचा वेळ, पैशाची बचत झाली आहे. स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास दोघे वेगळे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे जास्त कालावधी वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दावा दाखल करतेवेळी दोघे सुमारे 14 महिने वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. मुलीकडून ॲड. नागेश जेधे आणि ॲड. सुमित तरटे यांनी काम पाहिले. तर मुलाकडून ॲड. मंगेश कदम यांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही उच्चशिक्षित व्यावसायिक आहेत.
दोघांचा प्रेमविवाह 20 एप्रिल 2019 रोजी झाला. काही दिवस सुरळीत संसार केला. दोघांना एक मुलगा आहे. तो घटस्फोटासाठी अर्ज करताना 3 वर्षाचा होता. सुरळीत संसारानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर 1 मे 2023 पासून दोघे वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. निकालानुसार मुलगा पत्नीकडे असणार आहे.