सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये कडवटपणा

घटस्फोटासाठीच्या निम्म्या दाव्यांत फोटो चॅटिंगचा पुरावा

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – सोशल मीडियाचा वापर नात्यांसाठी घातक ठरत आहे. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे पन्नास टक्‍के दाव्यांत पुरावे म्हणून सोशल मीडियावरील जोडीदाराचे फोटो देण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा किती वापर करायचा याचा नागरिक, तरुणांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये यावरील फोटो आणि चॅटिंगवरून संशय निर्माण होत आहे. हा संशय थेट कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे. लग्नापूर्वीच पती-पत्नीचे इतर मित्रांसोबत काढलेले फोटो न्यायालयात पुरावे म्हणून दाखल करण्यात येत आहे. ते फोटो कधी काढले, त्याचे “इंटेशन’ काय होते, लग्नापूर्वी असलेल्या गुपिताची माहिती जरी जोडीदाराला दिली, तरी कालांतराने तो जोडीदार त्याचा पुरावा म्हणून वापर करत आहे. चॅटिंगचेही तसेच आहे, कोणत्या परिस्थितीत कोणाशी चॅटिंग केले, त्यावेळी तो मोबाइल कोणाकडे होता, याचा विचार न करता तो पुरावा दाखल केला जात आहे. कधी कधी फोटो क्रॉफ्टही केले जात असतात. थोडक्‍यात, तरुणांना अगदी पाच ते दहा वर्षांपूर्वी फिरायला गेल्यानंतर अथवा इतर कारणामुळे सोशल मीडियावर टाकलेले फोटो अंगलट येत आहेत. सुखी संसारात संशयाचे भूत निर्माण होत असल्याचे दिसत येते.

सोशल मीडियाचे सर्वांना लागले वेड
व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्‌विटरसह विविध सोशल मीडियाचा वापर तरुणाईकडून केला जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही याचा वापरण्यात मागे नाहीत. महाविद्यालयीन मुले-मुली तर सेल्फी, मित्र-मैत्रिणींसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. त्यावर लाइक मिळवत असतात. बिनधास्तपणे मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करत असतात. मात्र, हाच सोशल मीडिया त्यांच्यासाठी घातक ठरत आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. कामापुरता मर्यादित वापर करावा. एकमेकांशी बोलण्याचे माध्यम न बनविता सोय म्हणून तात्पुरता वापर करावा. सोशल मीडिया ऍप्लिकेशनवर विश्‍वास न ठेवता दाम्पत्याने एकामेकांवर विश्‍वास ठेवावा. जेणेकरून कुटुंब, पती-पत्नीमध्ये सोशल मीडियाच्या कारणावरून होणारे वाद थांबतील.
– ऍड. केदार शिंदे सचिव, पुणे बार असोसिएशन.

Leave A Reply

Your email address will not be published.