हडपसर (विवेकानंद काटमोरे, प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बहुचर्चित प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठया प्रमाणात हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या .
हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग रचनेवर 928 तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जवळपास 950 हरकती दाखल झाल्या असून आज शेवटच्या दिवशी हरकती व सूचनांचा पाऊस पडला.
नवीन फुरसुंगी प्रभागातून एकाच विषयाच्या तब्बल 841 हरकती आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेकडून एक फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती-सूचना दाखल करण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय- 928 हरकती
प्रभाग क्रमांक 22 मांजरी – शेवाळेवाडी, प्रभाग 23 साडेसतरानळी – आकाशवाणी, प्रभाग 24 मगरपट्टा- साधना विद्यालय, प्रभाग 25 हडपसर गावठाण – सातववाडी,प्रभाग 45 फुरसुंगी हे नवीन पाच प्रभाग येतात येथून 928 हरकती व सूचना हडपसर क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
ही मुदत आज सोमवार ( दि.14 ) दुपारी तीन वाजता संपुष्टात आली. त्यानंतर प्राप्त झालेल्या या सर्व हरकती व सूचनांचे विवरणपत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय – 950 हरकती
प्रभाग क्रमांक- 26 भीमनगर- रामटेकडी, प्रभाग क्रमांक 42 सय्यदनगर – लुल्लानगर, प्रभाग क्रमांक 43 वानवडी- कौसरबाग, प्रभाग क्रमांक 44 काळेपडळ – ससाणेनगर हे चार नवीन प्रभाग येतात येथून 950 हरकती व सूचना वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
तर, 26 फेब्रुवारी हा हरकतींवर सुनावणी घेण्याचा शेवटचा दिवस आहे . प्रभाग रचना तयार करताना 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर मोडतोड करून ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक अडचणीत आले आहेत. एवढेच नव्हे, तर प्रभाग रचनेच्या विरोधात न्यायालयात देखील जाण्याचा इशारा अनेकांनी दिला आहे. त्यामुळे दाखल झालेल्या हरकतीनुसार प्रारूप प्रभाग रचनेत किती आणि कसा बदल होणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे.