दैवगती

मध्यंतरी समाजमाध्यमांतून आलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्यात इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या गुजराती समाजाबद्दल अत्यंत गौरवाचे उद्गार काढले होते. गुजराती समाजाची कष्ट करण्याची आणि उद्योगी वृत्ती, कुटुंबाची तसंच कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेण्याची संस्कृती इ. गुणांचं कौतुक करणारं एका इंग्लिश राजकीय नेत्यानं त्यांच्या संसदेत केलेलं ते भाषण होतं. आफ्रिकेतील युगांडा देशात पूर्वी इदी अमीन नावाचा हुकूमशहा अनेक वर्षं राज्य करीत होता. त्यानं जनतेला खूष करण्यासाठी तिथं अनेक पिढ्या वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या आशियाई लोकांना देशातून हाकलून देण्याचं सत्र सुरू केलं आणि त्यांचे मालमत्ता व व्यवसाय ताब्यात घेतले. या आशियाई लोकांमध्ये बहुतांश गुजराती होते आणि त्यांनी कष्ट करून तिथं चांगलाच जम बसवला होता. त्यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्यानं त्यांना युगांडातून पळ काढून इंग्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. या लोकांचा त्या इंग्लिश नेत्यानं मोठ्या आदरानं उल्लेख केला आणि इंग्लंडच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचं महत्त्व पटवून सांगितलं. मला माझ्या अशाच ब्रिटिश नागरिक असलेल्या मित्राची आठवण झाली. त्याची जीवनगाथा युगांडामधून विस्थापित झालेल्या इतर सर्वांप्रमाणेच होती. पण एक मोठा फरक होता.

तो फरक म्हणजे हा माझा मित्र-महेंद्र-युगांडामधील अतिशय समृद्ध अशा व्यक्तींपैकी होता. होता असंच म्हणावं लागेल. दैवाचे फासे उलटे पडल्यामुळे महेंद्रला सगळी स्थावर मालमत्ता आपल्या एका कृष्णवर्णीय नोकराकडे सोपवून पळ काढावा लागला. युगांडामधील निसर्गसमृद्ध आणि सुंदरशा व्हिक्‍टोरिया सरोवराच्या काठी वसलेल्या जिंजा या शहराचा तो अनभिषिक्त राजाच होता म्हणा ना.

जिंजा इथं त्याच्या कुटुंबाची शेतीवाडी, मळे, पिठाच्या गिरण्या इतकंच काय पण एक सिनेमा थिएटरसुद्धा होतं. जिंजाच्या विकासासाठी महेंद्रच्या कुटुंबानं खूप कष्ट घेतले होते. तिथं बंधारा घालून जलविद्युत केंद्र उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे जिंजामध्ये वीज आली. स्थानिकांना केवळ रोजगारच नव्हे तर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळे व्यवसायही त्यांनी काढून दिले. एके काळी सुप्तावस्थेत असलेलं जिंजा महेंद्र आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रगतीच्या मार्गावर आणलं. केळीच्या बागा, मक्‍याची शेतं अशी विविध प्रकारची नगदी पिकं जिंजात फुलू लागली. गरीब स्थानिकांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला. लोक महेंद्र आणि त्याच्या कुटुंबाला दुवा देऊ लागले.
केशरयुक्त मसाला दुधात मिठाचा खडा पडावा तसंच काहीसं झालं. केवळ सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि व्हिक्‍टोरिया सरोवराकाठीच असलेल्या कंपाला या राजधानीच्या शहरात एक वेगळंच नाट्य घडत होतं.

राष्ट्रपती मिल्टन ओबोटे यांची सत्ता उलथवून दादा’ इदी अमीन राष्ट्रप्रमुख झाला आणि काही महिन्यांतच त्यानं आपले रंग दाखवायला सुरुवात केली. व्यापक जनाधार मिळवण्यासाठी अमीननं आशियाई-विशेषत: भारतीय वंशाच्या लोकांकडे असलेले व्यवसाय, त्यांची स्थावर आणि जंगम संपत्ती यांच्यावर टाच आणली. इंग्लंडबरोबरचे युगांडाचे संबंध रसातळाला मिळाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात नशीब काढण्याकरता आफ्रिकेत आलेल्या बहुतांश भारतीय वंशाच्या (यातील खूपसे गुजराती समाजातील होते) लोकांकडे ब्रिटिश पासपोर्ट होते. इदी अमीनकरता ही सुवर्णसंधीच होती, भारतीय वंशाचे लोक आणि त्यात इंग्लंडसारख्या शत्रुराष्ट्राचे पासपोर्ट! मग काय विचारता? काही तासातच या सर्व भारतीय वंशाच्या कुटुंबांची युगांडामधून हकालपट्टी करण्यात आली.

महेंद्र आणि त्याची पत्नी हेमलता लंडनला आले. पुनश्‍च हरि या तत्त्वानुसार त्यांनी लंडनच्या एका उपनगरात आपला संसार पुन्हा उभा केला. जिंजाच्या या कर्तबगार गृहस्थाला एका ऑटोमोबाइल कंपनीत नोकरी पत्करावी लागली. आज महेंद्र निवृत्तीच्य उंबरठ्यावर आहे परंतु सुदैवानं सर्व व्यवस्थित चाललं आहे.

माझी आणि महेंद्रची ओळखही अपघातानंच झाली. मी आणि माझी पत्नी युरोपच्या यात्रेला गेलो होतो. लंडनमध्ये आमची टूर समाप्त होत होती. मात्र आम्ही टूरबरोबर परतलो नाही कारण एका दिवसानंतर आम्ही माझ्या साडूंबरोबर वेल्समधील एक व्हिला भाड्यानं घेऊन 3-4 दिवस राहणार होतो. त्यामुळं एक दिवसाचाच प्रश्न होता. टूर संपल्यावर आम्ही जे हॉटेल सोडलं त्यात खोलीची उपलब्धी नव्हती. आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीशी संपर्क साधला आणि एक दिवसाची जवळपासच्या बेड अँड ब्रेकफास्ट सुविधा असलेल्या ठिकाणाची सोय करता येईल का असं विचारलं. त्या व्यक्तीनं काही कारणानं त्यांच्या घरी सोय होऊ शकत नसल्यानं आम्हाला महेंद्रकडे नेलं. सुरुवातीला महेंद्र फारसे उत्सुक दिसले नाहीत. मात्र मी त्यांच्याशी अस्खलित गुजरातीत संवाद साधून माझी माहिती दिली. महेंद्र व त्याची पत्नी यांचं समाधान झालेलं दिसलं आणि आता जवळजवळ वीसएक वर्षांच्या आमच्या मैत्रीचा पाया घातला गेला.

नंतर मी त्यांच्या घरी दोन-तीनदा राहून त्यांचा पाहुणचार घेतला आणि महेंद्र व हेमलताही आमच्याकडे दोन-तीन वेळा राहावयास आले. महेंद्रला भारताला अनेकदा भेट देऊनही इथल्या प्रगतीची फारशी माहिती नव्हती. त्यामुळं एकदा त्यानं मी जिथं काम करीत होतो त्या मोटार-निर्मितीच्या कारखान्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मीही रीतसर परवानगी काढून त्याला मोटार निर्मिती कशी होते ते दाखवलं. अगदी पाश्‍चिमात्य प्रगत देशात जसं उत्पादन होतं तसंच यंत्रमानवांचं साह्य घेऊन भारतातही होतं हे पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले मी पाहिले.
दैवगतीनं एका उद्यमी आणि कर्तबगार माणसाला एका वेगळ्याच देशात नेऊन जणू त्याची सत्त्वपरीक्षाच घेतली असं म्हणावं लागेल.

श्रीनिवास शारंगपाणी

Leave A Reply

Your email address will not be published.