जमीन बळकाविण्यासाठी वळविला नदीचा प्रवाह

नदीचे पात्र बदलून तयार केली साडेतीन एकर जागा


शिवणे-नांदेड सिटीच्या हद्दीजवळचा प्रकार


एनजीटीने घेतली गंभीर दखल

पुणे – नदीपात्राच्या कडेची जागा लाटण्यासाठी मुठा नदीत भराव टाकून तब्बल साडेतीन एकर जागा नदीपात्राच्या कडेला तयार करण्यात आली असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेड सिटीमधील पवार पब्लिक स्कूल आणि स्वामी समर्थ मठाच्या मागील बाजूस हा प्रकार घडला असून, त्यासाठी गेल्या 5 वर्षांत नांदेड सिटीच्या बाजूला असलेले नदीचे पात्र, चक्‍क शिवणेच्या दिशेला सरकविण्यात आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण (एनजीटी)ने घेतली असून, या प्रकरणासह आणखी 11 ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर, दिलीप मोहीते तसेच नरेंद्र चूग यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती याचिकाकर्ते यादवडकर आणि वेलणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

असे झाले नदीपात्र गायब…
नांदेड सिटीमधील विद्या प्रतिष्ठाणच्या पवार पब्लिक स्कूलच्या शाळेच्या मैदानाच्या तसेच स्वामी समर्थ मठाच्या मागील बाजूने मुठा नदीचे पात्र आहे. या पात्रातून वर्षभर पाण्याचा प्रवाह असतो. हे पात्र दुसऱ्या बाजूला शिवणे गावच्या दिशेने आहे. यादवडकर यांनी एनजीटीमध्ये सादर केलेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2014 मध्ये या ठिकाणी शिवणेच्या दिशेला नदीपात्रात एक चर घेण्यात आली. त्यानंतर, 30 ऑक्‍टोबर 2015 मध्ये ही चर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. तर 23 डिसेंबर 2018 मध्ये नांदेड सिटीच्या बाजूला असलेले सर्वच पात्र, राडारोडा तसेच मातीने बुजवून त्या ठिकाणी सुमारे साडेतीन एकर जमीन तयार करण्यात आली. तर पाण्याचे पात्र, शिवणे गावच्या दिशेने ढकलण्यात आले. आता या पात्रावर नव्याने बांधकाम सुरू असून हा भाग कोण वापरत आहे याची नेमकी कोणतीही माहिती नसल्याचे यादवडकर यांनी स्पष्ट केले. याबाबत न्यायालयात माहिती देण्यासाठी यादवडकर यांनी गेल्या 5 वर्षांतील गुगल इमेजचे पुरावे सादर केले आहेत.

आणखी 11 ठिकाणांचाही समावेश
याबाबत माहिती देताना, यादवडकर म्हणाले, या दोन्ही शहरांमधून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांवर झालेल्या एकूण 12 अतिक्रमणांबाबत एनजीटीमध्ये याचिका दाखल केली आहे. त्यात शिवणे येथील नदीपात्रासह मुठा नदीवरील दांगट औद्योगिक वसाहत, संगमवाडी या भागांचा समावेश असून मुळा नदीवरील पिंपळे-निलाख, जुनी सांगवी, रहाटणी, बोपोडी या भागांतील अतिक्रमणांचा समावेश आहे.

काय आहेत एनजीटीचे आदेश
या सर्व प्रकाराची गंभीर दखल एनजीटीने घेतली असून, न्यायाधिश एस. पी. वांगडी, के. रामकृष्ण आणि डॉ. नगीन नंदा यांनी दोन्ही महापालिका आयुक्‍तांनी तातडीने दोन्ही नद्यांमध्ये भराव टाकला जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या 12 ठिकाणांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव, सिया संस्थेचा प्रतिनिधी तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पुणे विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश असणार आहे. या समितीने पुढील 3 महिन्यांत या सर्व ठिकाणांची पाहणी करून त्याचा अहवाल न्यायालयास सादर करायचा आहे. तसेच, या समितीच्या कामासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ नोडल ऑफीसर म्हणून म्हणून काम पाहणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)