जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोनामुक्त

बूथ हॉस्पिटलमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरू

नगर  (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर नगर येथील बूथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून, जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालांपैकी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष, तर एक महिलेचा समावेश आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील रुग्णांची संख्या 17 झाली आहे. त्यातील 11 जणांवर उपचार सुरू आहेत. संगमनेर येथे एकूण आठ करोनाबाधित आढळून आले होते. त्यातील चौघे करोना मुक्त झाले आहेत. नेवासेत तीन करोनाबाधित होते. त्यातील एक करोना मुक्त झाला आहे, तर एकावर नगर येथील बूथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. इतर तालुक्यांतील करोनाबाधितांची संख्या कमी झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यानुसार नगर शहरात एकूण 11 करोनाबाधित सापडले होते. त्यात तीन परदेशी नागरिक, तर दोन परप्रांतीयांचा समावेश असून, ते करोना मुक्त झाले आहेत.

राहाता तालुक्यातील लोणी येथे एक, कोपरगाव एक, आष्टी येथे एक, असे जिल्ह्यात एकूण 43 करोनाबाधित रुग्ण आढळे होते. त्यातील सर्वाधिक जामखेड तालुक्यात त्याचा फैलाव झाला आहे. त्यातील 24 जण करोना मुक्त झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 17 रुग्णांवर नगर येथील बूथ हॉस्पिटमध्ये उपचार सुरु आहेत. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही करोनाची लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना, तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या. जिल्ह्यातील करोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 43 झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत एक हजार 495 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक हजार 419 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 15 अहवालांची प्रतीक्षा आहे. सध्या 690 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून,122 जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.