जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

नगर – दसरा-दिवाळीच्या आसपास जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी या सर्व ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभागरचना तयार झाली असून या प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज दि,4 संबंधीत गावांत ग्रामसभा घेवून जाहीर करण्यात आले. यावेळी सदर गावाच्या तालुक्‍यातील तहसीलदार कार्यालयातील प्रतिनिधी हजर होता.

जिल्ह्यातील एकूण 1316 ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 766 ग्रामपंचायतींचा कालावधी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यापूर्वी दोन महिने अगोदर या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यात आता थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होवून सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने गावोगावी पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक हाय होल्टेज होणार आहे. या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम नोव्हेंबर 2019 मध्ये जाहीर झाला.

तेंव्हापासून गावाची प्रभाग रचना करताना गुगलमॅपवरून प्रभागाचे नकाशे अंतिम करणे, त्यावर हरकती मागविणे,सुनावणी घेणे आदी कामे करण्यात आली. त्यानुसार आज तहसीलदारांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग रचनेवरील आरक्षण सोडती काढण्यात आल्या. यावर आता परत हरकती,सुनावणी होवून 21 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.