त्या शहरातील पोलीस ठाण्याच्या पाटीची जिल्हाभर चर्चा

अवैध धंदे, सावकारकीचा कणा मोडण्यासाठी सिंघम अधिकाऱ्याची स्वतःच्या कार्यालयातूनच सुरवात

जळोची (पुणे) – बारामती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सदैव चर्चेत असते. पुण्यात जशी पुणेरी पाट्यांची वारंवार चर्चा होते. तशीच जोरदार चर्चा सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या पाटीची जिल्हाभर सुरू आहे. लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. पोलीस स्टेशन येथे सर्व कामे विनामुल्य केली जातात. काही तक्रार असल्यास संपर्क साधा. असा मजकूर असलेली पाटी बारामती शहरातील पोलीस स्टेशनच्या पोलीस पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

बारामतीची सूत्रे हाती घेताच येथील सावकारी संबंधी प्रभावी कामगिरी करणारे व सावकारीचा बिमोड करण्यासाठी चंग बांधलेले पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे. शिंदे यांनी बारामतीचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलीस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा. या हेतूने पोलीस ठाण्यात अनेक बदल केले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांकडून विश्‍वासाचे वातावरण मिळावे, तसेच पोलीस आपल्या मदतीसाठीच आहेत. अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी. या उद्देशाने तशा आशयाची पाटी लावण्यात आली आहे.

नामदेव शिंदे यांनी यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर, खंडाळी, मळोली, श्रीपूर, तोंडले बोंडले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी, जयसिंगपूर या ठिकाणी आपल्या कार्याचा दमदार ठसा उमठवला आहे. या परिसरातील गावगुंडांची दहशत, खंडणी बहाद्दर, रोडरोमियोंचा बिमोड केला होता. गावागावातील तंटे, वाद मोडून काढण्यात त्यांना मोठे यश आले होते. तसेच अतिक्रमणे, अवैध धंदेवाल्यांचे कायद्याच्या चपराकीने कंबरडे मोडले होते. गोरगरीबांचा सिंघम ही त्यांची ओळख आजही आजही कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात कायम आहे. त्याचप्रमाणे आपल्या कामाचा ठसा आजही त्यांनी बारामती शहरात सुरू ठेवल्याचे पहावयास मिळत आहे.

  • …तरच कायदा सुव्यवस्था अबाधित राहील
    बारामती शहर, तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात खासगी सावकारकी बोकाळली आहे. यामुळे तालुक्‍यात गुन्हेगारी, अवैध धंदे जोरात सुरू आहेत. त्यासाठी येथील नव्याने आलेले पोलीस अधिकारी यांनी धडाकेबाज कामगिरी पोलीस ठाण्यात पाटी लावूनच सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीतील सावकारकी व अवैध धंदे कायमचे मोडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. यासाठी नामदेव शिंदे यांच्यासारख्याच अधिकाऱ्यांची शहराला गरज आहे, अशी चर्चा तालुक्‍यात रंगली आहे.

कोणावरती अन्याय अत्याचार झाला तर शांत न बसता थेट मला संपर्क करा. तक्रार करा. अत्याचार करणाऱ्याला फक्‍त जेलच नव्हे तर कायद्याची अद्दल काय असते ते दाखवतो. रोडरोमियो, गावगुंड, गोरगरिबांवर अन्याय करणारे गावपुढारी यांचा कायमचा बंदोबस्त कसा करायचा आणि पोलीसी खाक्‍या काय असतो त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मी आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस हजर आहे.
– नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक बारामती शहर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.