सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी वैतागले होता. त्यांच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी डॉ. गडीकर यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. कराड येथे रविवारी झालेल्या बैठकीतच आरोग्य मंत्र्यांनी डॉ. गडीकर यांची खरडपट्टी काढली.
डॉ. आमोद गडीकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्याविरोधात नाराजी होती. त्यांच्या कारभारामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रगतीला ब्रेक लागला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस वाढली होती. भरीस भर म्हणून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही दोन गट पडल्याने रुग्णालयाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत होता. याबाबत डॉ. गडीकरांना सामाजिक व राजकीय संघटनांनी व प्रसारमाध्यमांनी जागे करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनी कोणालाही न जुमानता जिल्ह्याच्या आरोग्य मंदिराचे वाटोळे केल्याचा आरोप होत होता. त्यांच्याविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे व थेट आरोग्य मंत्रालयात तक्रारींचा पाऊस पडला होता. या तक्रारींची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराड येथील बैठकीत डॉ. गडीकर यांची खरडपट्टी काढली. अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून तेथेच डॉ. गडीकर यांच्या उचलबांगडीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याची आरोग्य विभागासह संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता आहे.