शिरूर: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी शिरूर ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत रुग्णालयाचा सावळागोंधळ समोर आला असून, स्वच्छतेचा अभाव आणि औषधांच्या टंचाईसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. तपासणी दरम्यान रुग्णांच्या बेडशीट अस्वच्छ असणे, वॉर्ड व शौचालयांची दुरवस्था आणि औषधे वेळेवर उपलब्ध न करणे यांसारखे धक्कादायक प्रकार उघड झाले. ग्रामीण भागासाठी रुग्णालय महत्त्वाचे असतानाही रुग्ण भरतीचे प्रमाण संशयास्पदरीत्या कमी असल्याचे डॉ. यमपल्ले यांच्या निदर्शनास आले. या बेजबाबदारपणामुळे गरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत डॉ. यमपल्ले यांनी दिले आहेत.