जिल्हा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार

इंदापूरच्या विभागीय क्रीडा स्पर्धा विना अनुदानितच : सर्व नियम धाब्यावर

रेडा – राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने इंदापूर येथे दोन दिवसांपूर्वी पुणे विभागीय ज्युदो स्पर्धा पार पडल्या. ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या तालुक्‍यातील अनेक खेळाडुंना याबाबत कोणतीच माहिती नाही. त्यामुळे उद्योन्मुख खेळाडूंचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्हा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

इंदापूर येथे विभागीय ज्युदो स्पर्धा असल्याने त्यासाठी सोलापूर, पुणे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील व चार महानगरपालिकांमध्ये सोलापूर, अहमदनगर, पुणे व पिंपरी चिंचवड या भागांतील खेळाडू व त्यांचे क्रीडा शिक्षक यांना स्पर्धेला बोलावणे आवश्‍यक होते. यासाठी इंदापूर तालुक्‍यातील अनेक खेळाडूंना यासाठी निवडपत्र किंवा माहितीपत्र दिले नसल्याने अनेक खेळाडूंचे भवितव्य अंधातरी बनले आहे.

इंदापूरच्या स्पर्धांसाठी निरीक्षक म्हणून क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा विभागाकडून व आयोजकांनी खेळाडूंना सकस नाष्टा व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक होते. मात्र, स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जारमधील गार पाणी देण्यात आले आहे. अनेक खेळाडूंना नाष्टा मिळाला नसल्याचे सर्वांनी सांगितले.

क्रीडा विभागाकडून केवळ मान्यताप्राप्त संस्थांना या स्पर्धा घेता येतात. मात्र, सध्या जेथे स्पर्धा सुरू आहेत, त्या संस्थेला अशी मान्यता नाही. या स्पर्धांसाठी मान्यतापत्र अधिकृत पंच असणे आवश्‍यक आहे, तसे पंच या स्पर्धेत नव्हते. या ठिकाणी ज्या क्रीडा अधिकाऱ्याला निरीक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ते तर स्पर्धा संपण्याच्या अगोदरच तेथून गायब झाले. सध्या स्पर्धा सुरू असलेले असोसिएशन मान्यताप्राप्त नसून, वरील अधिकाऱ्यांना जेवणावळीच्या पार्ट्या देऊन स्पर्धांचे आयोजन करून घेतल्याचे एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

विभागीय स्पर्धेसाठी इंदापूर शहरातील श्री. नारायणदास रामदास विद्यालयाच्या 10 खेळाडूंना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. जेथे स्पर्धांचे आयोजन आहे. तेथे ही परिस्थिती असेल तर चार जिल्ह्यांत काय परिस्थिती असेल, असा संतप्त सवाल क्रीडाप्रेमींतून उमटत आहे.

इंदापूर येथे विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या स्पर्धांसाठी एकही रुपया क्रीडा विभागाचे अनुदान मिळाले नाही. सर्व स्पर्धा मी पदरखर्च करून करीत आहे. मागील स्पर्धेसाठी माझा जवळपास 60 हजार रुपये खर्च झाला. मात्र अधिकाऱ्यांनी केवळ पाच हजार रुपये टेकवले आहेत.
– दत्तात्रय व्यवहारे, विभागीय स्पर्धांचे आयोजक.


इंदापूर येथे विभागीय ज्युदो स्पर्धा मागणीवरून आयोजित केल्या आहेत. त्यासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान संबंधित संस्थेला दिले आहे. मात्र, आयोजक संस्थेने आम्हाला दिलेल्या माहितीत व स्पर्धा आयोजनात केलेल्या कुचराईची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व संस्थेवर शासकीय नियमानुसार कडक कारवाई करणार आहे.
– विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.