सातारा – जिल्हाधिकारी शेखर सिंह रजेवर गेल्याने प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे पदभार आला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासकपद व प्रभारी जिल्हाधिकारी या दोन्ही महत्वाच्या जबाबदाऱ्या आल्याने जिल्ह्याची सूत्रे विनय गौडा यांच्याकडे आली आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) असलेले विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एक वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. करोना, अतिवृष्टी या संकटात जिल्हा परिषदेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले होते. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने दि. 21 मार्चपासून जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून ते काम पाहत आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कामांना प्राधान्य त्यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह काही दिवसांपूर्वी रजेवर गेले होते. यादरम्यान गौडाही वैयक्तिक कारणास्तव रजेवर असल्याने जातपडताळणी विभागाच्या माधवी सरदेशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी आली होती.
विनय गौडा सोमवारी रजेवरुन परत आले असून मंगळवारपासून (दि. 17) प्रभारी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे गौडा यांच्याकडे आली आहेत. जिल्हा परिषद प्रशासक व प्रभारी जिल्हाधिकारी या दोन्ही महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना गौडा यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र, प्रशासनावर मजबूत पकड असल्याने या दोन्ही जबाबदाऱ्या ते चांगल्या प्रकारे सांभाळतील असे सांगितले जाते.