राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2021मधील आणि डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या वर्षभरात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना, आरक्षण आदि निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातील 1849 ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी ते नोव्हेबर 2021 या काळात संपली आहे. डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या 13 महिन्यांच्या काळात 6477 ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार आहे. अशा सर्व ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण निश्चित, मतदार यादीचे प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित करुन प्रत्यक्ष निवडणुक अशा तीन टप्यातील कार्यक्रम येत्या डिसेंबरपासून करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने जारी केले आहेत.
शुक्रवारपासून (दि. 3) प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायतीचे गुगल नकाशे काढून प्रभाग रचनेचा स्थळपाहणी करण्यास सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत प्रभाग पाडणे आणि सीमा निश्चित करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे, 31 डिसेंबरला आरक्षण सोडतीसाठी ग्रामसभांचे आयोजन करणे, 3 ते 10 जानेवारी 2022ला प्रभाग रचना, आरक्षण यावर हरकती सूचना मागवणे, 19 जानेवारीला उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांच्यासमोर प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. सर्व सोपास्कार झाल्यानंतर अंतिम ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्यानंतर 2 फेब्रुवारीला प्रभाग रचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार यादि जाहीर करण्यात येईल.
या ग्रामपंचायतींसाठी तयारी
येणिये खुर्द, गारगोटवाडी, येलबाडी, कोरेगाव खुर्द, भांबोली, चास, रोहकल, बहुळ, देवोशी, मांजरेवाडी, शिरोली, सुरकुंडी, अनावळे, बहिरवाडी, आंभू, आव्हाट, दौडकरवाडी, मिरजेवाडी, वाडा, पापळवाडी, सिद्धेगव्हाण, साकुर्डी, शेलगाव, साबळेवाडी, चिखलगाव, खरपुड, दरकवाडी, कोयाळी तर्फे वाडा.