रुग्णाची पुणे वारी थांबणार तरी कधी?
ऑन कॉलचे गणित जुळेना
निष्णात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कॉल बेसिसचा फंडा वापरला जात आहे. सध्या दोन फिजिशियन उपलब्ध कसे राहतील याकरिता डॉ. आमोद गडीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्णवेळ फिजिशियन मिळत नसल्यानेच काम चालू ठेवण्यासाठी गडीकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या डॉक्टरांशी रुग्णालय प्रशासनाची चर्चा सुरू आहे.
सातारा – क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात एक वरिष्ठ व दोन कनिष्ठ अशी फिजिशियनची पदेच भरली गेली नसल्याने रुग्णांची पुणे येथील ससून वारी संपलेली नाही. सातत्याने जाहिरात देऊन व आयएमएशी संपर्क करूनही शोधयात्रा संपत नसल्याने कोणी फिजिशियन देता का? फिजिशियन? असे विचारण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
जून 2018 मध्ये जिल्हा रुग्णालयाला फिजिशियनसह अन्य सहा डॉक्टर भरण्याचा निर्णय झाला होता. मात्र जाहिरातीला न मिळालेला प्रतिसाद, खाजगी वैद्यकीय क्षेत्रात एमडी डॉक्टरांना मिळणारे मानधन आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या दोन वेळेच्या राउंडसह प्री आणि पोस्ट मेडिकल चेकअप आणि उपचार पध्दतीमुळे एमडी डॉक्टरांना येथे कामाचा व्याप प्रचंड आहे.
शासकीय सेवेच्या तांत्रिक मर्यादा त्या तुलनेत डॉक्टरांना पुरेसे वेतन मिळण्याच्या अडचणी यामुळे जिल्हा रुग्णालयाला सेवाभावी वृत्तीने काम करणारे फिजिशियन मिळेनासे झाले आहेत. खाजगी क्षेत्रातील प्रोफेशनल ऍटिट्यूड शासकीय सेवेत अडचणीचा ठरत असल्याने गेल्या आठ महिन्यात जिल्हा रुग्णालयात फिजिशियनची एक वरिष्ठ व दोन कनिष्ठ अशी तीन पदे रिक्त आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता जिल्हा रुग्णालयाचा नेहमीचा अडचणीचा प्रश्न आहे. मंजूर खाटांपेक्षा दुप्पट रुग्ण आणि तितकी मंजूर पदांचे वैद्यकीय अधिकारी सुध्दा उपलब्ध नाही, यामुळे साताऱ्यात गंभीर परिस्थितीत ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना फिजिशियन अभावी पुणे ससूनचा रस्ता नाईलाजाने दाखवावा लागत आहे. इतक्या मोठ्या जिल्हा रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध नाहीत, अशी हाकाटी पिटवत त्याचे खापर जिल्हा चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यावर फोडले जाते. मुळात फिजिशियन उपलब्ध करण्यासाठी जून 2018 मध्ये आयएमए व आरोग्य संचालनालयाशी चर्चा करून फिजिशियनसह सात डॉक्टर उपलब्ध करण्याच्या हालचाली झाल्या होत्या.
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीकांत भोई यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या बदलीने प्रस्तावाच्या शिडातील हवाच निघून गेली. नंतर फिजिशियन सह रकत संक्रमण अधिकारी अशी काही पदे भरली गेली दरम्यान काही अंर्तगत कारणामुळे डॉक्टर महिला अधिकाऱ्याने सेवेला रामराम ठोकला मात्र याची अनेक कारणे गुलदस्त्यात असून त्यावर चर्चा न केलेलीच बरी अशा जिल्हा रुग्णालयातील अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत. हिमेटोलॉजी, नवजात शिशूचा अतिदक्षता विभाग व सहा ते अठरा वयोगटातील बालकांच्या तपासणीसाठी एमबीबीएस डीएनबी या पदाची भरती आवश्यक होती त्याचे सोपस्कारही दरम्यान काळात पार पडले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यानुभव व सेवाअनुभव याचे प्रमाण व्यस्त झाल्याने जिल्हा रुग्णालयात निष्णात डॉक्टरांची वानवा तीव्रतेने जाणवत . गडीकर साहेबांनी या प्रश्नांची तत्काळ तड लावावी अशी रुग्णांची कळकळीची मागणी आहे.