नगर | जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा

अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; रेमडेसीवीरसह अन्य औषधेही मुबलक प्रमाणात असल्याची ग्वाही

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सुचनेनुसार तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. सर्वाधिक गरजेचा असलेला ऑक्सीजनचा पुरेसा साठा असून, रेमडेसीवीरसह करोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली औषधेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आज देण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राठोड म्हणाले.

कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडिकलमध्ये रेमडेसीवीर विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील. मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करणत आले आहे, असे राठोड यांनी सांगितले.

औषधांची आणि मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शन तसेच उत्पादक, वितरक आणि रुग्णालयाचे प्रतिनिधी यांच्याबाबतचा समन्वय केला जात आहे. त्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस हे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज रोजी रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांपैकी साधारणता 2  हजार 419  रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 210 रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

तसेच, जिल्ह्यातील पाच उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता आज 24  मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या ऑक्सिजनचे वितरण केल्यानंतर देखील जवळपास 23  मेट्रिक टन साठा जिल्ह्यासाठी शिल्लक आहे, असे राठोड यांनी स्पष्ट केले. औषधाची आणि मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने आपणास कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.