पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त जिल्हास्तरीय श्री सेवागिरी खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन ३१ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता केले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी ट्रस्टने सलग अकराव्या वर्षी यात्रा स्थळावर या महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
या जिल्हास्तर युवा महोत्सवात लोकनृत्य (लाइव्ह), रेकॉर्ड लोकनृत्य, पथनाट्य, सुगम गायन, समूहगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र बक्षीस दिले जाईल. दरम्यान, स्पर्धकांना नियमाप्रमाणे प्रवास खर्च, जेवण व नाश्ता ट्रस्टमार्फत दिला जाईल. लोकनृत्य रेकॉर्ड डान्ससाठी लोकनृत्याची (लाइव्ह) नियमावली बंधनकारक राहील. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. सर्व स्पर्धकांना मोफत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी नऊपर्यंत जागेवर नोंदणी केली जाईल. महोत्सवासाठी देवस्थान ट्रस्टच्या नियम, अटी बंधनकारक राहतील.
हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारा आहे. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ट्रस्टने युवा टॅलेंटला एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा- कॉलेजमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीतजास्त संख्येने या युवा महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी केले आहे.