मुंबई – राज्यात कॉंग्रेसमधील घडामोडींना वेग आला असून जिल्हास्तरीय फेरबदल करत 9 नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लातूर, चंद्रपूर, औरंगाबादला जिल्हा आणि शहर, तसेच भंडारा, गोंदिया आणि ठाणे कॉंग्रेसला नवे जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत.
एकीकडे राहुल गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याची मागणी जोर धरत असताना महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू असतानाच बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.
लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लातूर जिल्हा कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक श्रीशैल उटगे यांची वर्णी लागली आहे. तर शहराध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख यांचे समर्थक ऍड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूरचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे यांनी गेली दहा वर्षे जबाबदारी सांभाळली.
कॉंग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष
लातूर – श्रीशैल मल्लिकार्जुन उटगे (जिल्हाध्यक्ष), ऍड. किरण जाधव (शहराध्यक्ष), औरंगाबाद – डॉ. कल्याण काळे (जिल्हाध्यक्ष), मोहम्मद हिशाम उस्मानी (शहराध्यक्ष), ठाणे – ऍड. विक्रांत चव्हाण (शहराध्यक्ष), भंडारा – मोहन पंचभाई (जिल्हाध्यक्ष), गोंदिया – नामदेव किरसान (जिल्हाध्यक्ष),
चंद्रपूर – रितेश तिवारी (जिल्हाध्यक्ष), प्रकाश देवतळे (शहराध्यक्ष).