जिल्हा फुटबॉल साखळी स्पर्धा : अव्वल श्रेणीमध्ये बीईजीला विजेतेपद

पुणे – बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप संघाने पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) तर्फे आयोजित साखळी स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटात विजेतेपद पटकाविले तर परशुरामियन्स्‌ संघास उपविजेतेपद मिळाले. पुणे सिटी फुटबॉल क्‍लब (एफसी) संघाने 14 आणि 16 वर्षाखालील गटाचे अजिंक्‍यपद मिळवित दुहेरी मुकुट पटकावला.

ढोबरवाडी येथील पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मैदानावर हे सामने झाले. अव्वल श्रेणी गटाच्या सामन्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) आणि परशुरामियन्स्‌ फुटबॉल क्‍लब यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. बीईजीकडून प्रेम नंदा आणि एस. लोखंडे तर, परशुरामियन्स्‌ फुटबॉल क्‍लबकडून गुलाम अन्सारी याने दोन गोल केले. स्पर्धेत बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप (बीईजी) आणि परशुरामियन्स्‌ क्‍लब या दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 सामन्यांमध्ये विजय व एका सामन्यात बरोबरी करीत 37 गुणांची कमाई केली. बीईजी संघाने 42 गोल मारले व 4 गोल स्वीकारले. परशुरामियन्स्‌ क्‍लबने 44 गोल केले पण 10 गोल स्वीकारले. या गोल फरकामुळे बीईजी संघास विजेतेपद देण्यात आले.

स्पर्धेतील 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात एफसी पुणे सिटी संघाने केशव माधव प्रतिष्ठान संघाचा टायब्रेकरद्वारा 5-4 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. पूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत राहल्याने टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. यामध्ये एफसी पुणे सिटीकडून उस्मान खान, अर्शद बागवान, फहाद शेख, हर्षवर्धन धुमाळ, भार्गव सावंत यांनी गोल केले. केशव माधव प्रतिष्ठान संघाकडून गौरव मोरे, स्टॅलिन हिरेकरी, सुमित पतंगे, हर्षवर्धन मिया यांनी गोल केले. एफसी पुणे सिटी संघाने लायन पीसीएच संघाचा टायब्रेकरद्वारा 4-3 असा पराभव करून 16 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळविले.

Leave A Reply

Your email address will not be published.