पोटनिवडणुकीसाठी अर्ज स्वीकारणे सुरू ः जात वैधता प्रमाणपत्रासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या 49 जागांच्या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र आज (दि. 30) नोव्हेंबरपासून स्विकारण्यास सुरुवात झाली. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात उमेदवारी अर्ज स्वीकृत केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉं वैशाली वाघमारे यांनी दिली.
निवडणुकीसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 49 जागांसाठी होणाऱ्या आरक्षित जागांसाठी उमेदवारी नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी समितीचे जात प्रमाणपत्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. सोमवारी (दि. 29) राज्य मंत्रीमंडळात याबाबत चर्चा होऊन ग्रामपंचायतीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
36 ग्रामपंचायतीच्या 49 जागांसाठी शासकीय सुट्टी वगळुन 6 डिसेंबर अखेर सकाळी 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशन स्विकारणे, अर्ज छाननी 7 डिसेंबर, माघारी गुरुवार 9 डिसेंबर अखेर दुपारी 3 वाजेपर्यंत. नंतर उमेदवार निवडणूक चिन्ह वाटप, मतदान मंगळवार, दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत होणार असून मतमोजणी 22 डिसेंबरला तालुका क्रीडा संकुलात होणार आहे.