पंचवीस वर्षांपूर्वीपासूनची मागणी दुर्लक्षित, आणखी दोन नवीन कोर्ट सुरू राहणार
फलटण – जिल्हा न्यायालयाचे बेंच फलटणला होण्यासाठी 20 ते 25 वर्षांपूर्वी फलटण वकील संघातर्फे मागणी करण्यात आली होती. परंतु, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे फलटण येथे जिल्हा न्यायालय सुरू होण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. फलटण येथे जिल्हा न्यायालयाचे बेंच कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
फलटण येथे या जून महिन्यापासून 2 नवीन कोर्ट सुरू होत आहेत. या पूर्वी फलटणला 4 कोर्ट सुरू होते व आता नव्याने सुरू झालेले 2 कोर्ट असे एकूण 6 कोर्ट आता फलटण न्यायालयीन कक्षेत सुरू राहणार आहेत. फलटण येथील कोर्टाच्या आवारात 4 व तहसीलदार कार्यालयाच्या वरील इमारतीमध्ये 2 अशा प्रकारे एकूण 6 कोर्ट सुरू राहणार आहेत.
फलटण वकील संघातर्फे 20 ते 25 वर्षांपूर्वी फलटणला जिल्हा न्यायलायचे बेंच सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी वडूज येथे माण व खटाव तालुक्यांसाठी जिल्हा न्यायालयाचे बेंच सुरू करण्यात आले आहे.
वडूजसारख्या ठिकाणी जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आले, तर फलटणसारख्या विकसनशील भागामध्ये जिल्हा न्यायालयाचे बेंच सुरू का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फलटण येथे जिल्हा न्यायालयाचे बेंच सुरू करण्यात यावे, असा ठराव काही दिवसांपूर्वी फलटण पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सदस्यांनी एकमुखाने केला होता. याबाबत पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर- निंबाळकर यांनी हा ठराव करण्यासाठी पुढाकार घेतला होता.