सातारा : जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक रविवारी (दि. ८) सकाळी साडेदहा वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हा प्रभारी श्रीरंग (नाना) चव्हाण- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानावर सर्वत्र संशय व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेला निकाल अनपेक्षित आहे. म्हणून ईव्हीएमविरोधात आंदोलन करून यापुढे होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याबाबत काँग्रेसकडून देशभर आंदोलन उभारले जाणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्याबाबत प्रदेश काँग्रेसने निर्देश दिले आहेत. त्याचा शुभारंभ यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशावर विचारविनिमय करून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा काँग्रेस समितीचे सर्व सेल व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुरेश जाधव व नरेश देसाई यांनी केले आहे.