वाळवा, शिरगावमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना काटेकोरपणे करा – डॉ.अभिजीत चौधरी

सांगली : वाळवा, शिरगाव या गावांमध्ये पूर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने आता स्वच्छतेची मोहीम काटेकोरपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले.

पूरबाधित वाळवा, शिरगाव येथे आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत वाळवा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रविंद्र सबनीस, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती प्रा.सुषमा नायकवडी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले, पूर ओसरला असून पुरामुळे परिसर गाळ व कचरा यामुळे अस्वच्छ झाला आहे. या परिसराची तात्काळ स्वच्छता करून नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी लवकरात लवकर गावे स्वच्छ करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे काम करावे. स्वच्छ पिण्याचे पाणी, पाण्यामध्ये आवश्कतेनुसार क्लोरीनचे प्रमाण, आरोग्य, विद्युत पुरवठा याबाबत संबंधित यंत्रणानी दक्ष राहून कामे करावीत. घरांचे, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोटभाग वाळवा, नदीकाठचा परिसर या ठिकाणीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुपनलिका, पाण्याचे स्त्रोत चांगले आहेत का याची पाहणी केली. औषध फवारणीबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. पूरग्रस्तांसाठी शासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन त्यांनी हवलदार वस्ती शिरगाव, शिरगाव येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात आलेली आर्थिक मदत मिळते का नाही याबाबत विचारपूस करून नागरिकांशी संवाद साधला.

पुरामुळे कमकुवत झालेली घरे राहण्यायोग्य आहेत की नाहीत याचे प्रमाणपत्र घेऊनच नागरिकांनी घरामध्ये राहण्यासाठी जावे. पडक्या घरात राहण्यासाठी जावू नये असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी तात्पुरती निवारण केंद्रे उभे करावीत, असे निर्देश संबंधितांना दिले. यावेळी संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.